Thursday, September 8, 2011

प्रिय स्पर्धक आणि संयोजक मित्र मैत्रिणींनो,
असं काही नाहीये... की सध्या वक्तृत्वासाठी म्हणजे वक्तृत्व स्पर्धेसाठी चांगले परीक्षक नाही मिळत... प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे कि चांगल्या निकालाची अपेक्षा करण्यापूर्वी आणि परीक्षकांची मापे काढण्यापूर्वी स्पर्धकांनी खालील मुद्दे लक्षात घ्यावेत.. किंबहुना आपली मानसिकता तयार करावी.. म्हणजे निकालाचं जास्त दुःख होणार नाही..
१. प्रत्येक स्पर्धकाला वाटत असतं की आपला परफोर्मंस सर्वोत्कृष्ट झालाय आता आपणच पहिले येणार.... (प्रत्यक्षात इतर स्पर्धकांची भाषणे ऐका आणि तुमच्या पेक्षा चांगलं बोललेल्या स्पर्धकाच्या गुणवत्तेच कौतुक करून त्याचं श्रेष्ठत्व त्यावेळेपुरतं का होईना पण मान्य करा... अर्थात याला फार मोठ्ठं मन लागतं. विशेषतः तो स्पर्धक जर आपल्या ग्रुप चा नसेल तर..)
२. तुमच्या सादरीकरणाला जर परीक्षकांनी योग्य न्याय दिला नसेल तर, त्यांच्याशी वाद न घालता, त्यांच्या दृष्टीने तुमच्या सादरीकरणात काय काय त्रुटी होत्या त्या समजाऊन घेण्याचा प्रयत्न करा..
आणि भविष्यात त्या सुधारण्यावर भर द्या. ( अर्थात स्वतःच्या त्रुटी मान्य करायलाही फार मोठ्ठं मन लागतं.)
३. परीक्षकांची मानसिकता कशी आहे हे बऱ्याच स्पर्धांमध्ये स्पर्धेच्या आधी स्पर्धकांना कळतच नाही. किंबहुना संयोजक त्याविषयी परीक्षकांना स्पर्धा सुरु होण्याआधी त्यांची भूमिका मांडू देतील तर फार बरं होईल असं माझं मत आहे.. खरंतर सगळ्या स्पर्धांमध्ये हा प्रमुख नियम करायला हवा. अर्थात मी जेव्हा स्पर्धक होतो तेव्हा पासूनच ही गोची आहे. म्हणून मी शक्यतो ज्या स्पर्धेला परीक्षक म्हणून जातो तिथल्या संयोजकांना विनंती करतो की, स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी मला स्पर्धकांशी संवाद साधू दे... आणि त्यांना या गोष्टीची करून देवू दे की, आम्ही परीक्षण करताना कोणकोणते निकष लावणार आहोत.. स्पर्धकांनी कोणकोणत्या गोष्टींची दक्षता घ्यावी. थोडक्यात चालू स्पर्धेतील Dos & Dont's काय आहेत. (पण पुन्हा याचा उपयोग फक्त न.भू.नाच होतो.. कारण ते प्रामाणिकपणे सभागृहात उपस्थित असतात. पण त्यांना त्याचा फायदा नाही घेता येत.. आणि प्र.भू. ना काही उपयोग होत नाही कारण प्रभूगीरीच्या अलिखित नियमांनुसार प्र. भू. सभागृहात उपस्थितच नसतात. क्वचितप्रसंगी उदघाटनाला आणि परीक्षकांची भूमिका ऐकायला स्पर्धास्थळापर्यंत पोहोचतच नाहीत. अर्थात कुणी एवढे कष्ट घ्यायचे..? आणि कशासाठी..?)
४. बऱ्याच वेळा स्पर्धा संयोजकांचे परीक्षकाला बोलावण्याचे निकष ठरलेले असतात..
उदा.
अ. परीक्षक जवळचा असावा.. नात्याने आणि अंतरानेही, म्हणजे कमी खर्चात काम होऊन जाते.
ब. भरपूर मान आणि किमान धन घेऊन, खुश होऊन वर त्यांचे गोडवे गाणारा असावा..
क. क्वचित प्रसंगी तो तज्ञ नसला तरी काही हरकत नसते.. म्हणजे विषयज्ञानाच्या नावाने बोंब...!
ड. बरं असलाच तज्ञ तरी त्याला त्यासंदर्भाने इतर व्यावहारिक ज्ञान असतेच असे नाही. चालू संदर्भ, तदनुषंगिक उदाहरणे, दाखले, असतात किंवा स्पर्धक श्रोत्यांच्या प्रतिसादासाठी क्वचित प्रसंगी त्यांचा वापर करतात हे त्यांना बिचाऱ्याना माहित ही नसते. असो..
इ. परीक्षक विशिष्ट विचारसरणीचा असावा. मी अधिक काही बोलत नाही.

५. या सगळ्यांतून महत्त्वाचं म्हणजे स्पर्धेला ३-३ परीक्षक असतात. त्यामुळे तुम्ही स्पर्धकांनी एकाच परीक्षकाला दोष देणं किंवा सरसकट सगळ्याच परीक्षकांची लायकी काढणे बरोबर नव्हे.
कधीकधी एखाद्या परीक्षकाच्या गुणांकनामुळे निकाल बदलू शकतो, या गोष्टीचा विचार करा.
यावर कुणी म्हणेल कि सर्वांना आवडलेल्या भाषणाला नंबर द्या.
मग अशावेळी त्या परीक्षकांना त्यांचे मार्क बदलायला लावणे / भाग पाडणे हा भ्रष्टाचार नाही का.? जे गुण ज्या परीक्षकांनी जसे दिले आहेत तसे ते गुण त्या स्पर्धकाच्या पदरात पडायला नकोत का....?
६. तुमचं सादरीकरण आणि गुणांकन ह्या दोन सर्वस्वी वेगवेगळ्या गोष्टी आहेत.. त्या जुळून आल्या तर तुम्हाला बक्षीस मिळतं अन्यथा नाही. मात्र याचा अर्थ असं अजिबात नव्हे की तुम्ही कमी पडलात किंवा तुमची गुणवत्ता कमी झाली. सचिन तेंडूलकर प्रत्येक सामन्यात शतक काढू शकत नाही, कधीकधी तो शून्यावर ही आउट होतो, कधी २०-३० धावा काढतो, कधी ५०-६०, तर कधी ९०-९९ धावा काढतो.. म्हणून त्याची योग्यता, गुणवत्ता अजिबात कमी होत नाही. प्रत्येक स्पर्धे पूर्वी आणि नंतरही स्वतःचं आत्मपरीक्षण जरूर करा, पण स्वतःचं मूल्यमापन त्या स्पर्धेच्या यशापयशाने अजिबात करु नका.
७. एक लक्षात ठेवा... मी हे सर्व मुद्दे मांडतोय याचा अर्थ अजिबात असा नाही कि, मी आजच्या गुणवत्ताहीन, उच्चपदस्थ परंतु अननुभवी, स्वार्थी नी भ्रष्ट, पूर्वग्रहदुषित अन पक्षपाती परीक्षकांच्या चुकीच्या निकालांचे वा त्यांचे समर्थन करतोय...!!
माझ्या मते अशा दुर्गुणी सेटलमेंट करून स्पर्धा जिंकवून देणार्या परीक्षाकांबद्दल आणि त्याला प्रोत्साहन देणार्या, भूलणार्या, फाशी पडणार्या स्पर्धकांच्या विरोधातही तुम्ही आवाज उठवला पाहिजे.. (पण प्रत्यक्ष पुरावे देऊन.. नाहक एखाद्या परीक्षाकांविषयी पूर्वग्रहाने अफवा पसरविणे आणि त्याला बदनाम करणे हे योग्य नव्हे आणि अपेक्षितही नाही.)

८. माझ्या मते परीक्षकासाठी निकष :-
अ. त्याने किमान १०० तरी विविध आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा केलेल्या असाव्यात त्यातील ५ तरी प्रथम क्रमांकाने, १० द्वितीय क्रमांकाने, १० तृतीय क्रमांकाने आणि किमान १० उत्तेजनार्थ बक्षीस मिळविलेले असावे.
ब. त्याने संबंधित स्पर्धेला जाण्यापूर्वी स्पर्धेतील विषयांचा किमान अभ्यास केलेला असावा.. निदान प्रत्येक विषयाचा अभिप्रेत अर्थ आणि वास्तवातील संदर्भ या मुद्द्यांचा तदनुषंगिक विचार केलेला असावा.
क. प्रत्येक स्पर्धकाला संबंधित विषयाच्या त्याला समजलेल्या भूमिकेतून विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. आपल्या अपेक्षा परीक्षकाने स्पर्धकांवर लादू नयेत. फक्त श्रोत्यांच्या भूमिकेतून त्याचं सादरीकरण आपल्याला पटलं की नाही हे पडताळावं.
ड. स्पर्धकांविषयी कोणताही पूर्वग्रह ठेऊ / बाळगू नये. असलाच तरी त्याचा परिणाम त्यांच्या गुणदानावर अजिबात होऊ देऊ नये. प्रत्येकाला त्याच्या हक्काचे गुण प्रामाणिकपणे व सद्सद्विवेक बुद्धी जागृत ठेऊन द्यावे.
इ. परीक्षकाने कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये.... पैसा, मैत्री, नेत्र कटाक्ष, थेट नजरानजर, सौंदर्य, आत्यंतिक लाघवीपणा, स्तुती, कौतुक, निंदा-नालस्ती ... इत्यादी.
आजकालचे स्पर्धक परीक्षकांना जिंकण्याचे बरेच फंडे वापरत असतात. त्याला आपण फशी पडू नये.
फ. स्पर्धा सुरु झाल्या पासून संपे पर्यंत कोणत्याही स्पर्धकाशी एक शब्द सुद्धा बोलू नये. किंबहुना कोणत्याही स्पर्धकाला तुमच्याशी संपर्क साधण्यापासून सक्त मनाई करावी. ( कितीही परिचयाचा स्पर्धक असला तरी तुमच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा निकालाशी काहीही संबंध नसावा आणि तसे मैत्रीपूर्ण संबंध स्पर्धेच्या ठिकाणी तरी किमान दाखवू नयेत किंवा त्या स्पर्धकाला दाखविण्याची संधी देऊ नये.)
ग. परीक्षणाच्या निकषांची स्पर्धकांना स्पर्धा सुरु होण्यापूर्वी ( प्र.भू. स्पर्धकांसाठी स्पर्धेच्या मध्यंतरात सुद्धा पुन्हा एकदा ) स्पष्ट माहिती करून द्यावी.
ह. शक्यतो, तीनही परीक्षक एकाच वयोगटाचे असावेत.
य. प्रत्येक स्पर्धकाचे योग्य मुद्दे आणि चुकांची नोंद दोन्ही ही करणे परीक्षक म्हणून बंधनकारक आहे. अन्यथा तो त्याच्यावर अन्याय ठरेल. प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या या दोन्ही गुण दोषांची माहिती होणं, त्याचा त्याच्या भविष्यातील सादरीकरणासाठी उपयोग होणं हे परीक्षकांच जास्त महत्त्वाचं कार्य आहे.
ज. केलेल्या परीक्षणाचे योग्य ते स्पष्टीकरण, समर्थन करण्याची क्षमता असावी.

मी हे माझे मुक्त विचार तुम्हां सर्व सुज्ञांसमोर ठेवत आहे.

कदाचित माझे चुकले असेल तर सर्व स्पर्धकांनी मिळून मला माफ करा..

प्रा. गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक,
पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे.
सहजसंपर्क :- 9021501924
rajgarde@gmail .com