Monday, September 28, 2015

"क... क... करिअरचा" - लेखांक ३. दि. २८ सप्टेंबर २०१५





लेखांक.
"क... क... करिअरचा"

नमस्कार मित्रहो,
          मागील लेखात आपण करिअर निवडीबाबत पालकांच्या असणा-या मानसिकतेविषयी जाणून घेतले. या लेखात आपण, आपल्या करिअर निवडीविषयी नेमके कोणते निकष लावायचे? याविषयी जाणून घेऊ.
 
         पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवावी की, आपण आपल्या करिअरविषयी किती जागरूकतेने पूर्वाभ्यास करतो, हे सर्वांत महत्त्वाचे. दरवर्षीच्या साध्या वार्षिक परीक्षेअगोदर आपण वर्षभर तयारी करतो, अनेक वेळा सराव, उजळणी करतो, संभाव्य प्रश्नसंच आणि मागील प्रश्नपत्रिका अभ्यासतो, पूर्ण तयारीनिशी १०० गुणांचा पेपर देतो. अगदी त्याचप्रमाणे, ज्या क्षेत्रात आपले करिअर होणार असते, पुढची २५-३० वर्षे आयुष्य जाणार असते, आपली ओळख आणि गुणवत्ता सिद्ध होणार असते, त्याविषयी पूर्वतयारी नको का करायला.....? ज्याप्रमाणे अन्य कोणतीही वस्तू किंवा निर्णय घेताना, आपण अनेक शक्यता, अनेक पर्याय तपासून पाहत असतो, तसेच आपल्या पाल्याच्या करिअरविषयक निर्णयातही, आपण इतर अन्य शक्यता आणि पर्यायही तपासून पहायला नकोत का...? नेमके इथेच सारे पालक आणि विद्यार्थी गाफील राहतात आणि ऐनवेळी बरेचदा घाई गडबडीत निर्णय घेताना दिसतात. म्हणूनच करिअर निवडीला प्राधान्य देऊन, थोडासा गृहपाठही अवश्य करावा.
 
    “मग, आम्ही आमच्या पाल्याचे करिअर नेमके कोणत्या गोष्टींवर निवडावे बरे..?” असा प्रश्न, बरेचदा कार्यशाळा आणि व्याख्यानादरम्यान मला अनेक पालक हताशपणे विचारतात. मी सांगतो, की एकदम सोपे आहे. पुढील पंचसूत्री लक्षात ठेवा आणि आपल्या पाल्याच्या करिअरविषयी तुम्ही अंदाज करू शकता.




१. पाल्याची आवड :- प्रत्येक व्यक्तीला उपजतच काही ना काहीतरी आवड ही असतेच. एका विशिष्ट गोष्टीची आवड नाही, असा माणूस शोधूनही सापडत नाही. हि आपल्या पाल्याची उपजत आवड नेमकी कशात आहे, हे तुमच्यासारख्या दक्ष पालकांच्या नजरेतून सुटूच शकत नाही. लहानपणापासून आपल्या पाल्याला नेमक्या कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या गोष्टी तो टाळतो, हे आठवून बघा. त्याला ज्या गोष्टींचा तिटकारा येतो, ज्या गोष्टीत तो अजिबात रस घेत नाही, त्या क्षेत्रात तो कधीच जाणार नाही. उदा. त्याला जर जखम झालेली, रक्त आलेलं सहन होत नसेल, त्याविषयी त्याच्या मनात भीती असेल, तर त्याला मेडिकल प्रवेश घेण्याची कल्पनाही असह्य होईल. तेच, जर तो दुस-यांना औषधोपचारासाठी मदत करण्यात तत्पर असेल, मनातून धाडसाने आणि हिरीरीने तो शाळेत किंवा परिसरामध्ये वैद्यकीय सेवांमध्ये, शिबिरांमध्ये सहभागी होत असेल तर, त्याला त्या क्षेत्राविषयी नक्कीच ओढ आणि आवड असणार. तसेच जर आपला पाल्य जर का  सोसायटीमध्ये, गावातील मंडळांमध्ये, सार्वजनिक कार्यक्रमांतून सहभाग घेऊन पुढाकाराने आणि नेतृत्वाने काही गोष्टी करत असेल, तर त्याच्यात व्यवस्थापकीय कौशल्ये वाढत जातात, नेतृत्व गुण विकसित होतात आणि अशी मुले पुढे जाऊन, Management किंवा राजकीय क्षेत्रात नकीच यशस्वी होऊ शकतात. म्हणूनच तर मराठीत जुनी म्हण आहे की, “मुलाचे पाय पाळण्यात दिसतात.” हे जुन्या लोकांनी किती योग्य ओळखले होते बघा.

२. पाल्याचा शैक्षणिक आणि बौद्धिक कल :- प्रत्येकाच्या शैक्षणिक आणि बौद्धिक क्षमता ह्या वेगवेगळ्या असतात आणि त्याच्या त्या त्या क्षमतांचा त्याच्या करिअर निवडण्यावर फार मोठा परिणाम होत असतो. उदा. एखाद्याला गणित या विषयात काही म्हणजे काहीच कळत नाही, पण त्याला इतिहासातील बारीक सारीक तपशील लक्षात राहतात. एखाद्याला विज्ञानातील व्याख्या लक्षात राहत नाहीत, पण त्याच विज्ञानातील आकृत्या मात्र तो प्रचंड सुबक रीतीने काढतो. एखाद्याला इंग्रजी विषयातील स्पेलिंग्ज आणि ग्रामर अजिबात समजत नाही, पण त्याच्या डोक्यात संशोधनाचे अनेक विचार चालू असतात. कुणी मुलगी भूमितीत कच्ची असते, पण रांगोळी काढण्यात तरबेज असते. हा प्रत्येक विद्यार्थ्याचा कल Know Your Creativity Index किंवा Aptitude Tests च्या माध्यमातून वेळीच जाणून, समजून, तपासून घ्यावा. 




३. विद्यार्थ्याची शारीरिक क्षमता :- विद्यार्थ्यांच्या मानसिक आणि बौद्धिक क्षमते प्रमाणेच शाररीक क्षमताही वेगवेगळ्या असतात. काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये जाण्यासाठी उच्चतम शारीरिक क्षमतेची आवश्यकता असतेच. उदा. पोलीस दल किंवा सशस्त्र सेना दलात जाण्यासाठी विद्यार्थ्यांना अतिशय कठीण शारीरिक कष्टांना सामोरे जाण्याची मानसिक आणि शारीरिक तयारी असणे आवश्यकच आहे. भूसेना, नौदल, वायूदल तसेच राष्ट्रीय किंवा राज्य राखीव दल, सीमा सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल, अग्निशामक दल, होमगार्ड, कोस्टल गार्ड यांसारख्या परामिलीटरी सेवांमध्ये जाण्यासाठी कठोरतम शारीरिक सराव आवश्यक असतो. वैमानिक, संशोधक, डॉक्टर,  बांधकाम अभियंता (सिव्हील इंजिनिअर), नाविक किंवा ड्रायव्हर होण्यासाठीही शारीरिक क्षमता लागतेच. तशीही प्रत्येक क्षेत्रासाठी थोडीफार शारीरिक क्षमता आवश्यक असतेच. फक्त आपल्या पाल्याची शारीरिक क्षमता ओळखूनच आपण त्याचे करिअर निवडावे.


४. पालकांची आर्थिक क्षमता :- काही अभ्यासक्रम हे फार खर्चिक असतात. वेगवेगळ्या क्षेत्रांतील अभ्यासक्रमातील फीज या वेगवेगळ्या असतात. आपली आणि आपल्या पाल्याची स्वप्ने ही “दिवास्वप्ने” ठरू नयेत, यासाठी एकतर पालकांनी आपल्या पाल्याच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद फार आधीपासूनच करून ठेवावी किंवा आपल्या आर्थिक कुवतीला झेपेल, एवढ्याच करिअर पर्यायांचा विचार करावा. उदा. डॉक्टर होण्यासाठी MBBS, MD या पदव्यांचा खर्च भरमसाठ आहे. म्हणून, जर MBBS ऐवजी तुलनेने कमी खर्चिक BAMS, BHMS या पदव्यांचा किंवा DMLT, BMLT, B.Farm. D.Farm, Nursing, Lab Technicion, X-Ray Technician अशा अन्य पारामेडिकल पर्यायांचाही विचार करायला हरकत नाही. कारण, आपण एकाच अत्यंत महागड्या, खर्चिक आणि न पेलवणा-या करिअरचा अट्टाहास धरून बसलो तर, अधांतरी अवस्था होऊ शकते.

५. भविष्यातील व्यवसाय आणि नोकरींची संधी :- आपण ज्या क्षेत्रात करिअर करू इच्छितो, त्या क्षेत्रात (आपले शिक्षण पूर्ण होऊन आपण मार्केटमध्ये येईपर्यंतच्या) येणा-या काळात नोकरीच्या किती संधी उपलब्ध असतील, याचाही थोडासा विचार करिअर निवडीपूर्वी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे. कोणकोणत्या क्षेत्रांत पुढील पाच-सात-दहा वर्षांत भरपूर आणि दीर्घकाळ संधी असू शकते, यावर शक्यतो नियोजनपूर्वक करिअर निवड करावी. नाहीतर, आत्ता अमुक एका क्षेत्रामध्ये संधी आहे, म्हणून त्या विशिष्ट अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन, तो पूर्ण करून बाहेर पडेपर्यंत, त्या क्षेत्रातील, त्या करिअरमधील बहर ओसरलेला असू शकतो. गेल्या १५-२० वर्षांचा अभ्यास करता, असे बरेचसे ट्रेंड्स मार्केटमध्ये बदलताना दिसलेले आहेत.
अर्थातच या पंचसूत्रीचा विचार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर सुरु करावा. हे सगळे जेवढे सहज वाटते, तेवढे सहज नक्कीच नाहीये. पण तरीही, तज्ज्ञ करिअर मार्गदर्शकांकडून करिअर नियोजन करून घेणे आणि त्यानुसार शक्य ती तयारी सुरु ठेवणे, हे केव्हाही चांगलेच. 

अशा अनेक शहरांतील, विविध महाविद्यालयांतील कित्येक यशस्वी सेमिनार्स आणि वैयक्तिक मार्गदर्शन कार्यशाळांतून मी आणि माझी टीम, पालकांच्या अनेक शंकांचे आणि चिंतांचे निराकरण करून, त्यांना एक ठोस करिअर प्लानिंग करून देत असतो. त्यामध्ये पालकांना, त्यांच्या पाल्यांना समुपदेशन आणि वैयक्तिक मार्गदर्शनासोबतच एक Career Planning Report आणि Action Plan तयार करून दिला जातो. या करिअर नियोजन आराखड्यामुळे अनेक पालकांना, त्यांच्या मुलांना नव्याने समजून घेता येणे आणि त्यांना योग्य तो करिअर आधार देणे, शक्य झाले आहे.


आश्चर्य म्हणजे १२वी आणि पदवीतील विद्यार्थ्यांबरोबरच इयत्ता ५वी ते १०वी या वर्गातील पालकांचा या नियोजनासाठी सर्वाधिक आणि प्रचंड प्रतिसाद मिळतो. जेवढ्या  लवकर ही गोष्ट विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा आणि मुख्याध्यापकांच्या लक्षात येते, तेवढ्या लवकर या मुलांना, मुलांविषयी निर्णय घेणे, अतिशय सोपे आणि सुलभ बनते, हा आमचा गेल्या दहा-बारा वर्षांतील अनुभव आहे. इच्छुक पालकांसाठी, पुण्यामध्ये नेहमी होणा-या या करियर नियोजन शिबिराच्या यंदाच्या दिवाळीतील सत्राच्या तारखा, लवकरच निश्चित केल्या जातील. इच्छुक विद्यार्थी आणि पालकांच्या खास मागणीवरून विविध शहरांतूनसुद्धा या एकदिवसीय समुपदेशन कार्यशाळा आणि KYCI - Know Your Creative Index शिबिरे आयोजित केली जातात. मराठवाडा आणि विदर्भातील या करिअर मार्गदर्शन सत्रांबद्दलची सविस्तर माहिती, आम्ही तुम्हांला याच सदरातून वेळोवेळी देत राहू. तेव्हा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी, “ क ····  ···· करिअरचा...! ”  हे सदर नेहमी वाचत राहा.
करिअरविषयी, करिअर नियोजनाविषयी, नोकरीविषयी तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न, समस्या, शंका, अडचणी असतील, तर फोनद्वारे, What's App द्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून अत्यंत मोकळेपणाने विचारा.

पुढच्या अंकात पुन्हा नव्या लेखासोबत भेटू, तोवर धन्यवाद.


 दि. २सप्टेंबर २०१५
---- आपला विनम्र,
प्रा. गुरूराज ग. गर्दे.
शैक्षणिक समुपदेशक - सल्लागार,
करिअर मार्गदर्शक व शिवव्याख्याता.
"आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट "
कार्यालय -  गाळा क्र. लक्ष्मीवंदन अपार्टमेंट

गावविहिरीच्या समोर, मारुती मंदिर जवळ
रायकरमळाधायरी, पुणे४११०४१.
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
(Off) - 8308138373. | What's Up :- 9422058288

Tuesday, September 22, 2015

"क... क... करिअरचा" - लेखांक २. दि. २३ सप्टेंबर २०१५

 


लेखांक २.
"क... क... करिअरचा"
नमस्कार मित्रहो,

            आपण मागील लेखात करिअर विषयक आढावा घेतला.  या लेखामधून आपण करिअर निवडीच्या सुरुवातीबद्दल जाणून घेऊया.  साधारणतः शालेय जीवनापासूनच आपल्याला इतिहासात अभ्यासलेल्या, समाजात वावरणा-या, आपल्या आजूबाजूला असणा-या, आपल्या संपर्कात येणा-या विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची भुरळ पडू लागते. शालेय जीवनातच आपल्याला आपल्या समाजातील विविध पेशांतील, विविध व्यवसायातील अनेक भूमिकांची तोंडओळख होऊ लागते. बालपणी आपल्याला डॉक्टर, शिक्षक, वाणी – व्यापारी, धोबी, न्हावी, दुधवाला, पेपरवाला, ड्रायव्हर, कंडक्टर, रिक्षावाला, राजकीय नेता, पुढारी असा वेगवेगळा व्यवसाय करणा-या व्यक्तींचा त्यांच्या व्यवसायाद्वारे आपल्याशी परिचय होत जातो.

          
           पुढे शालेय स्तरावर आपल्याला  वैद्न्यानिक, संशोधक, इंजिनिअर, बँकिंग, फायनान्स या व्यवसायांशी संबंधित व्यक्तिमत्वांची माहिती मिळते. आपला अभ्यास जसजसा वाढत जातो, तसतसे आपल्याला पालकांकडून विविध क्षेत्रांबद्दल क्वचितप्रसंगी माहितीही मिळते. बरेचदा हि माहिती ऐकीव असते. म्हणजेच, पालकांच्या संपर्कातील कोणीतरी त्या त्या क्षेत्रात असतात, म्हणून ते आपल्या पालकांना “आपण निवडलेलेच क्षेत्र कसे चांगले आणि फायदेशीर आहे”, हे अधिक ठामपणे सांगू शकतात. पालकही सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींच्या स्वप्नवत वर्णनांनी भारावून जातात आणि मग आपल्या पाल्यांकडून या सर्वच क्षेत्रातील करिअरसाठी अपेक्षा ठेवू लागतात. क्वचितच काही पालक या विषयी अधिक तपशीलात माहिती गोळा करतात.
 
     पण सार्वत्रिकपणे, सर्वच पालक नेहमी आपल्या पाल्यांकडून अपेक्षा मात्र नक्कीच ठेवतात. आपण जे करिअर करू शकलो नाही तेच करिअर आपल्या मुलाने किंवा मुलीने करावे अशी आईवडिलांची प्रबळ इच्छा असते. तसेच ज्या क्षेत्रांत आपण अनेक वर्षे काम करतोय, त्याच क्षेत्रात मुलाने किंवा मुलीने यावे, असेही त्यांना वाटत असते. शिवाय, आपले नातेवाईक, मित्र किंवा अन्य परिचितांची मुले ज्या क्षेत्रांत गेली आहेत त्या क्षेत्रांतच आपल्या मुलांनी करिअर करावे, असेही त्यांना वाटत असते. सरधोपटपणे, आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, संगणकतज्ज्ञ, संशोधक, मोठ्या पदावर काम करणारा सरकारी अधिकारी व्हावे अशीच कोणत्याही पालकांची सामान्यपणे अपेक्षा दिसून येते. त्यासाठी ते खूपच आधीपासून मुलांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांत इतर विषयांच्या तुलनेत सरस असावेत म्हणून प्रयत्नही सुरु करतात.



           दहावी नंतर म्हणूनच, सर्वाधिक पालकांचा प्राधान्यक्रम हा कला आणि वाणिज्य शाखांपेक्षाही विज्ञान शाखेलाच अधिक असतो. काही प्रमाणात हे बरोबर असले तरीही मी पालकांना, कला आणि वाणिज्य शाखेतील करिअर संधींचाही साकल्याने अभ्यास करायला सांगतो. पालकांची अशी मानसिकता असण्याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांनी आपल्या मुलाला विश्वासात घेऊन त्याच्या बौद्धिक, वैचारिक, मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा विचारच केलेला नसतो. "मुलांना जाणवणा-या समस्या आणि भेडसावणारे प्रश्न यांचा जरासा गृहपाठ करून, मगच पालकांनी आपल्या पाल्याच्या करिअरची दिशा ठरवावी," असे मी वारंवार माझ्या समुपदेशन कार्यशाळांच्या आणि कार्यक्रमांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील अनेक पालकांना सांगत आलोय.

                मुळातच आपण पालकांनी, आपल्या पाल्यांना तज्ज्ञ करिअर मार्गदर्शकांकडून सर्व क्षेत्रांतील करिअर विषयक संधींची माहिती द्यावी. पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांच क्षेत्रांतील करिअर विषयक माहिती अशा मार्गदर्शन कार्यक्रमांतून, सेमिनारमधून उपलब्ध झाल्याने, त्यांना स्वतः या सर्व संधींचा तौलनिक अभ्यास करता येतो.  शिवाय KYCI - Know Your Creative Index, Aptitude Test, Science Olympiad, Maths IQ Test, Science Projects Competitions, अशा अनेक उपक्रमांची चाचणी पालकांना आपल्या पाल्यासाठी आपापल्या शहरातच करता येऊ शकते.   
 
     अशा प्रकारचे अनेक विधायक शैक्षणिक उपक्रम, असे तज्ज्ञ करिअर मार्गदर्शकांचे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, करिअरचे विविध पर्याय त्या त्या गावातील, परिसरातील शाळांनी, मुख्याध्यापकांनी, महाविद्यालायांनी प्राचार्यांनी किंवा सामाजिक संस्थांनी, संघटनांनी एकत्रितपणे आयोजित करावेत.  पालकांना आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर म्हणजे, इयत्ता आठवी, नववी आणि दहावी या वर्षांतच किंवा उशिरात उशिरा अकरावी आणि बारावीत तरी किमान उपलब्ध करून द्यावेत.  जेणेकरून, करिअर नियोजन करणे सर्वांना सोपे जाईल आणि याचा निश्चित, शाश्वत फायदा शाळा, महाविद्यालयांना आणि परिसरालाच होईल.


                        
                             एका रात्रीच्या सरावाने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळत नाही, तलावात पोहायला शिकल्यावर लगेच, इंग्लिश खाडी पार करता येत नाही. क्रिकेटची Bat हातात धरल्यावर लगेच, भारतीय राष्ट्रीय संघात प्रवेश मिळत नाही. दहावीला गणित, इंग्रजी, विज्ञान विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले म्हणून लगेच, अंतराळवीर होता येत नाही. बारावीला बोर्डात चमकले म्हणून, लगेच नासात संशोधक होता येत नाही. इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला म्हणून लगेच, मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळत नाही. 
तर या आणि अशा अनेक स्वप्नांना परिपूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रवास, आवश्यक आहे. याची तयारी पालक आणि विद्यार्थी जेवढ्या लवकर एकत्रितपणे बसून करतील तेवढ्या लवकर त्यांना त्यातील संभाव्य अडचणींचे ज्ञान होईल आणि त्यावर मात करायची एक निश्चित सूत्री, ते शोधून काढतील.
 
          एका विद्यार्थ्याला घडविण्यामागे केवळ त्याचे पालकच नव्हे तर त्याचा सभोवताल, त्याची शाळा, महाविद्यालय, त्याचे शिक्षक, त्याच्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींची प्रेरणा असते. किंबहुना ती प्रेरणा तशी असायला हवी. चला आपण सारे एकत्र येऊन, आपल्या परिसरातील सर्वच पाल्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, कार्यशील होऊ या. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निवडण्यासाठी आपण सक्षम बनवू. चला सगळेजण एकत्र येऊन अशा अनेक संधींची योग्य, सुनियोजित व्यवस्था आपापल्या परिसरातील शाळा - महाविद्यालयांतून राबवू आणि नवीन पिढीला खरोखरच करिअरसाठी अधिक सक्षम बनवू.
                करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, KYCI - Know Your Creative Index, Aptitude Tests असे अनेक विधायक शैक्षणिक उपक्रम आपल्या शाळा - महाविद्यालयांतून राबविण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत. 
तुमच्या या करिअर नियोजन आणि करिअर पर्यंतच्या प्रवासांत मी एक मित्र, सखा, मार्गदर्शक, सल्लागार म्हणून सदैव तुमच्या पाठीशी नाही, तर तुमच्या सोबत असेन, हा विश्वास देतो. 
           करिअरविषयी, करिअर नियोजनाविषयी, नोकरीविषयी तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न, समस्या, शंका, अडचणी असतील, तर फोनद्वारे, What's App द्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून अत्यंत मोकळेपणाने विचारा.

पुढच्या अंकात पुन्हा नव्या लेखासोबत भेटू, तोवर धन्यवाद.
 
दि. २३ सप्टेंबर २०१५
---- आपला विनम्र,
प्रा. गुरूराज . गर्दे.
शैक्षणिक समुपदेशक - सल्लागार,
करिअर मार्गदर्शक व शिवव्याख्याता.
"आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट "
कार्यालय -  गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट

गावविहिरीच्या समोर, मारुती मंदिर जवळ, 
रायकरमळाधायरी, पुणे४११०४१.
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
(Off) - 8308138373. | What's Up :- 9422058288
FB Link :- www.facebook.com/EduStudentCounselor