Tuesday, September 22, 2015

"क... क... करिअरचा" - लेखांक २. दि. २३ सप्टेंबर २०१५

 


लेखांक २.
"क... क... करिअरचा"
नमस्कार मित्रहो,

            आपण मागील लेखात करिअर विषयक आढावा घेतला.  या लेखामधून आपण करिअर निवडीच्या सुरुवातीबद्दल जाणून घेऊया.  साधारणतः शालेय जीवनापासूनच आपल्याला इतिहासात अभ्यासलेल्या, समाजात वावरणा-या, आपल्या आजूबाजूला असणा-या, आपल्या संपर्कात येणा-या विविध क्षेत्रातील वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांची भुरळ पडू लागते. शालेय जीवनातच आपल्याला आपल्या समाजातील विविध पेशांतील, विविध व्यवसायातील अनेक भूमिकांची तोंडओळख होऊ लागते. बालपणी आपल्याला डॉक्टर, शिक्षक, वाणी – व्यापारी, धोबी, न्हावी, दुधवाला, पेपरवाला, ड्रायव्हर, कंडक्टर, रिक्षावाला, राजकीय नेता, पुढारी असा वेगवेगळा व्यवसाय करणा-या व्यक्तींचा त्यांच्या व्यवसायाद्वारे आपल्याशी परिचय होत जातो.

          
           पुढे शालेय स्तरावर आपल्याला  वैद्न्यानिक, संशोधक, इंजिनिअर, बँकिंग, फायनान्स या व्यवसायांशी संबंधित व्यक्तिमत्वांची माहिती मिळते. आपला अभ्यास जसजसा वाढत जातो, तसतसे आपल्याला पालकांकडून विविध क्षेत्रांबद्दल क्वचितप्रसंगी माहितीही मिळते. बरेचदा हि माहिती ऐकीव असते. म्हणजेच, पालकांच्या संपर्कातील कोणीतरी त्या त्या क्षेत्रात असतात, म्हणून ते आपल्या पालकांना “आपण निवडलेलेच क्षेत्र कसे चांगले आणि फायदेशीर आहे”, हे अधिक ठामपणे सांगू शकतात. पालकही सर्वच क्षेत्रांतील व्यक्तींच्या स्वप्नवत वर्णनांनी भारावून जातात आणि मग आपल्या पाल्यांकडून या सर्वच क्षेत्रातील करिअरसाठी अपेक्षा ठेवू लागतात. क्वचितच काही पालक या विषयी अधिक तपशीलात माहिती गोळा करतात.
 
     पण सार्वत्रिकपणे, सर्वच पालक नेहमी आपल्या पाल्यांकडून अपेक्षा मात्र नक्कीच ठेवतात. आपण जे करिअर करू शकलो नाही तेच करिअर आपल्या मुलाने किंवा मुलीने करावे अशी आईवडिलांची प्रबळ इच्छा असते. तसेच ज्या क्षेत्रांत आपण अनेक वर्षे काम करतोय, त्याच क्षेत्रात मुलाने किंवा मुलीने यावे, असेही त्यांना वाटत असते. शिवाय, आपले नातेवाईक, मित्र किंवा अन्य परिचितांची मुले ज्या क्षेत्रांत गेली आहेत त्या क्षेत्रांतच आपल्या मुलांनी करिअर करावे, असेही त्यांना वाटत असते. सरधोपटपणे, आपल्या मुलांनी डॉक्टर, इंजिनिअर, संगणकतज्ज्ञ, संशोधक, मोठ्या पदावर काम करणारा सरकारी अधिकारी व्हावे अशीच कोणत्याही पालकांची सामान्यपणे अपेक्षा दिसून येते. त्यासाठी ते खूपच आधीपासून मुलांनी गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयांत इतर विषयांच्या तुलनेत सरस असावेत म्हणून प्रयत्नही सुरु करतात.



           दहावी नंतर म्हणूनच, सर्वाधिक पालकांचा प्राधान्यक्रम हा कला आणि वाणिज्य शाखांपेक्षाही विज्ञान शाखेलाच अधिक असतो. काही प्रमाणात हे बरोबर असले तरीही मी पालकांना, कला आणि वाणिज्य शाखेतील करिअर संधींचाही साकल्याने अभ्यास करायला सांगतो. पालकांची अशी मानसिकता असण्याचे एकमेव कारण म्हणजे, त्यांनी आपल्या मुलाला विश्वासात घेऊन त्याच्या बौद्धिक, वैचारिक, मानसिक आणि शारीरिक क्षमतांचा विचारच केलेला नसतो. "मुलांना जाणवणा-या समस्या आणि भेडसावणारे प्रश्न यांचा जरासा गृहपाठ करून, मगच पालकांनी आपल्या पाल्याच्या करिअरची दिशा ठरवावी," असे मी वारंवार माझ्या समुपदेशन कार्यशाळांच्या आणि कार्यक्रमांच्या माध्यमांतून महाराष्ट्रातील अनेक पालकांना सांगत आलोय.

                मुळातच आपण पालकांनी, आपल्या पाल्यांना तज्ज्ञ करिअर मार्गदर्शकांकडून सर्व क्षेत्रांतील करिअर विषयक संधींची माहिती द्यावी. पालकांना आणि विद्यार्थ्यांना सगळ्यांच क्षेत्रांतील करिअर विषयक माहिती अशा मार्गदर्शन कार्यक्रमांतून, सेमिनारमधून उपलब्ध झाल्याने, त्यांना स्वतः या सर्व संधींचा तौलनिक अभ्यास करता येतो.  शिवाय KYCI - Know Your Creative Index, Aptitude Test, Science Olympiad, Maths IQ Test, Science Projects Competitions, अशा अनेक उपक्रमांची चाचणी पालकांना आपल्या पाल्यासाठी आपापल्या शहरातच करता येऊ शकते.   
 
     अशा प्रकारचे अनेक विधायक शैक्षणिक उपक्रम, असे तज्ज्ञ करिअर मार्गदर्शकांचे करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, करिअरचे विविध पर्याय त्या त्या गावातील, परिसरातील शाळांनी, मुख्याध्यापकांनी, महाविद्यालायांनी प्राचार्यांनी किंवा सामाजिक संस्थांनी, संघटनांनी एकत्रितपणे आयोजित करावेत.  पालकांना आणि विद्यार्थ्यांना लवकरात लवकर म्हणजे, इयत्ता आठवी, नववी आणि दहावी या वर्षांतच किंवा उशिरात उशिरा अकरावी आणि बारावीत तरी किमान उपलब्ध करून द्यावेत.  जेणेकरून, करिअर नियोजन करणे सर्वांना सोपे जाईल आणि याचा निश्चित, शाश्वत फायदा शाळा, महाविद्यालयांना आणि परिसरालाच होईल.


                        
                             एका रात्रीच्या सरावाने ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक मिळत नाही, तलावात पोहायला शिकल्यावर लगेच, इंग्लिश खाडी पार करता येत नाही. क्रिकेटची Bat हातात धरल्यावर लगेच, भारतीय राष्ट्रीय संघात प्रवेश मिळत नाही. दहावीला गणित, इंग्रजी, विज्ञान विषयात पैकीच्या पैकी मार्क्स मिळाले म्हणून लगेच, अंतराळवीर होता येत नाही. बारावीला बोर्डात चमकले म्हणून, लगेच नासात संशोधक होता येत नाही. इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाला नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळाला म्हणून लगेच, मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळत नाही. 
तर या आणि अशा अनेक स्वप्नांना परिपूर्ण करण्यासाठी नियोजनबद्ध प्रवास, आवश्यक आहे. याची तयारी पालक आणि विद्यार्थी जेवढ्या लवकर एकत्रितपणे बसून करतील तेवढ्या लवकर त्यांना त्यातील संभाव्य अडचणींचे ज्ञान होईल आणि त्यावर मात करायची एक निश्चित सूत्री, ते शोधून काढतील.
 
          एका विद्यार्थ्याला घडविण्यामागे केवळ त्याचे पालकच नव्हे तर त्याचा सभोवताल, त्याची शाळा, महाविद्यालय, त्याचे शिक्षक, त्याच्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींची प्रेरणा असते. किंबहुना ती प्रेरणा तशी असायला हवी. चला आपण सारे एकत्र येऊन, आपल्या परिसरातील सर्वच पाल्यांचे उज्ज्वल भवितव्य घडविण्यासाठी प्रयत्नशील राहूया, कार्यशील होऊ या. विद्यार्थ्यांना त्यांच्या उज्ज्वल भविष्याची दिशा निवडण्यासाठी आपण सक्षम बनवू. चला सगळेजण एकत्र येऊन अशा अनेक संधींची योग्य, सुनियोजित व्यवस्था आपापल्या परिसरातील शाळा - महाविद्यालयांतून राबवू आणि नवीन पिढीला खरोखरच करिअरसाठी अधिक सक्षम बनवू.
                करिअर मार्गदर्शन कार्यक्रम, KYCI - Know Your Creative Index, Aptitude Tests असे अनेक विधायक शैक्षणिक उपक्रम आपल्या शाळा - महाविद्यालयांतून राबविण्यासाठी आम्ही नेहमीच तुमच्या सोबत आहोत. 
तुमच्या या करिअर नियोजन आणि करिअर पर्यंतच्या प्रवासांत मी एक मित्र, सखा, मार्गदर्शक, सल्लागार म्हणून सदैव तुमच्या पाठीशी नाही, तर तुमच्या सोबत असेन, हा विश्वास देतो. 
           करिअरविषयी, करिअर नियोजनाविषयी, नोकरीविषयी तुमच्या मनातील कोणतेही प्रश्न, समस्या, शंका, अडचणी असतील, तर फोनद्वारे, What's App द्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेटून अत्यंत मोकळेपणाने विचारा.

पुढच्या अंकात पुन्हा नव्या लेखासोबत भेटू, तोवर धन्यवाद.
 
दि. २३ सप्टेंबर २०१५
---- आपला विनम्र,
प्रा. गुरूराज . गर्दे.
शैक्षणिक समुपदेशक - सल्लागार,
करिअर मार्गदर्शक व शिवव्याख्याता.
"आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट "
कार्यालय -  गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट

गावविहिरीच्या समोर, मारुती मंदिर जवळ, 
रायकरमळाधायरी, पुणे४११०४१.
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
(Off) - 8308138373. | What's Up :- 9422058288
FB Link :- www.facebook.com/EduStudentCounselor

No comments:

Post a Comment