
"बदलता सभोवताल..."
आपल्या जगण्यामध्ये किती गोष्टी बदलत गेल्या याचा विचार करताना, आपल्या
आजूबाजूला सगळे काही बदललेय आणि आपल्या आतमध्येही बरेच काही बदललेय असे आढळून
येते. आपल्या जगण्यात भौतिक सुखांच्या बरोबरीनेच सामाजिक, आर्थिक, बौद्धिक, वैचारिक, अध्यात्मिक
आणि तात्विक बदलही खूपच झालेत. पैशाने आपल्या जगण्याच्या, जीवनाच्या
सगळ्या परिभाषाच बदलून टाकल्यात, असं वाटू लागतं. चार आणे आणि
आठ आणे गेल्यापासून, "रुपयाचे आणे किती? आणे म्हणजे काय?" हे असले प्रश्नच नव्या पिढीला पडेनासे झालेत. थेट रुपयांची आणि तेही दहा
रुपयाच्या पटीची एक नवी परिभाषा पैशाला प्राप्त झाली.
पूर्वी घरामध्ये, आपल्या म्हणण्याला किंमत येण्यासाठी, तसे
काहीतरी कर्तृत्व करावे लागत होते. पण आता लहान मुलांनाच फार किंमत असते बुआ
कुटुंबात. लहान मूल हेच घराचा केंद्रबिंदू बनले आहे. आमच्या लहानपणी मला आठवतंय, वार्षिक
परीक्षेत प्रथम क्रमांक आला किंवा तत्सम विद्यार्थीदशेतील काही घवघवीत यश संपादन
केले, तरच क्वचित प्रसंगी चार आणे बक्षिसाची कमाई होई. एकरकमी चार आणे बघण्याची
ही एवढीच संधी असायची. नाहीतर, अगदी हायस्कूलात जाईपर्यंत, आमचे सारे
शौक हे दहा किंवा वीस पैशांच्या नाण्यांवरच पुरे झालेत. पाच, दहा, पंधरा
पैशामध्ये आम्हां सगळ्या मित्रांना मिळून एकत्रित संपणार नाहीत, एवढे चणे
- फुटणे यायचे. मग ते आम्ही सगळ्यांना देवून, पुरवून
पुरवून खायचो. आताच्या सारखे, पाच-दहा रुपयात मिळणारी
हवेची पाकिटे तेव्हा नव्हती. आमच्या बालपणीची पाच-दहा पैशांची चैन, आता
पाच-दहा रुपयांची कधी झाली हे कळलेच नाही.
पूर्वी गावोगावी होणारी विविध कंपन्यांची नाटके, आता केवळ
प्रेक्षागृहातून आणि नाट्यगृहांतूनच होतात, जत्रेमध्ये
पूर्वीच्या महाराष्ट्रीयन पद्धतीची दुकाने-खेळ जाऊन, आता उत्तर
भारतीय पद्धतीचे "मेले" गावोगावी लागू लागलेत. "टुरिंग टाकीज" जाऊन आता
मल्टीप्लेक्स आलेत. आठ आठ दिवस एकाच वर्तुळात सायकल चालविणारे, विविध
कसरतींचे खेळ करणारे पूर्वीचे डोंबारी, गारुडी, वासुदेव, भोरपी, पिंगळ्या
आणि नंदीबैलवाले हे आमच्या बालपणाच्या दैनंदिन जीवनाचे कुतुहलाचे, आपुलकीचे
आणि करमणुकीचे असणारे विषय, लोक आता केवळ कलाप्रकार म्हणून, एखाद्या
फेस्टिवलमध्येच मुलांना बघायला मिळतात. नाहीतरी, याहीपेक्षा
एक प्रचंड आभासी आणि समृद्ध जगाचे दर्शन घडविणारे, "टिव्ही"
नावाचे यंत्र नव्या पिढीच्या ताब्यात आले, आणि
डोरेमोन, शिनच्यान सारखे "विदेशी संस्कृतीचे जागरकर्ते" मुलांच्या
भावविश्वात केव्हा सरकले, दाखल झाले, हे खुद्द पालकांनाही कळले नाही.


पूर्वी केवळ दूरदर्शन पुरतंच असलेलं टिव्हीचे "दूरचं दर्शन", आधी
केबलच्या रूपाने आणि नंतर डिशच्या रूपाने आपल्या दिवाणखान्यात काही फुटांवर येऊन, आपल्या
अख्ख्या घराला, कुटुंबाला किंबहुना आपल्या अख्ख्या जगण्यालाच गिळंकृत करेल, असे जर
कुणी वीसेक वर्षांपूर्वी सांगितले असते, तर त्याला
आमच्या लहानपणी सगळ्यांनी वेड्यातच काढले असते. आमच्या लहानपणी, बुधवारच्या
साडेआठच्या चित्रहारसाठी, शनिवारच्या संध्याकाळच्या पिक्चरसाठी, रविवारच्या
"रामायण" व "महाभारत"साठी, भारत-
पाकिस्तान क्रिकेट म्याचसाठी, दुस-यांच्या घरात जाऊन पुढची
जागा पटकावणारी पिढीच, आता आपल्या घरात स्वतःच्याच अस्तित्वासाठी, जागेसाठी
झगडताना दिसतेय. अनेक संक्रमणे पाहिलेल्या या पिढीला तेव्हाही काही बोलता येत
नव्हतं आणि आताही बोलता येत नाहीये. पूर्वी मोठ्यांसमोर बोलायची प्राज्ञा नव्हती
आणि आता आपल्याच लहान मुलांसमोर व घरातील महिलामंडळासमोर काहीही बोलायची सोय
उरलेली नाही. अनेकविध च्यानेल्स आणि विविध मालिकांनी समस्त घराघरांतून जो धुमाकूळ
चालवलाय ना, तो पाहता, पुढील काही वर्षांत घरातील सगळ्यांचे "परस्पर संवाद" सुद्धा, केवळ या
मालिकांमधील असलेल्या "डायलोग" सारखे बोलले जातील की काय? अशी एक
भाबडी भीती माझ्या मनात निर्माण होते.


"तासाला आठ आणे" भाड्याने
मिळणा-या सायकलींची दुकाने आता बंद झाली आहेत. पूर्वीच्या राजदूत-जावा-याझदी या
गाड्याही गेल्या, बजाजच्या प्रिया, चेतक, सुपर या स्कूटर्सही कालबाह्य झाल्या, एके काळची शान समजल्या जाणा-या "प्रिमियर
पद्मिनी" दिसेनाश्या झाल्या, जुन्या बसगाड्या आणि ट्रक्स बदलले, रेडीओ
गेले, गावागावातील पार गेले- कट्टे गेले, चावड्या
गेल्या, मंदिरातील चर्चा आणि गावपंचायती गेल्या, गावविहीरी
गेल्या, नद्या आटल्या, डोह उघडे पडलेत, गावाजवळील जंगले संपली, पक्षी उडून गेले, प्राणी
केवळ संग्रहालयात दिसू लागलेत, रानमेवा आटला, करवंदीच्या
जाळी गेल्या, आंब्या - चिंचेची, पेरू-जांभळांची झाडे गेली, बैठी कौलांची घरे -
घरांसामोरील अंगणे व घरामागची परडी गेली, उंचच ऊंच
"बिल्डिंगा" उभ्या राहू लागल्या, गावठाणे
गेली आणि उपनगरे झाली. सगळीकडे सुबत्ता आली, सगळ्यांकडे
पैसे आले. जमिनीला भाव आले, जमिनीतील गुंतवणूक ही सोन्यापेक्षा जास्त फायदेशीर गुंतवणूक ठरली. भोवतालचे
सगळे परिमाणच बदलले. जग बदलले, जगण्याचे संदर्भ बदलले, पण आपल्या
आतमध्येही एवढा बदल होईल असे वाटले नव्हते.
कधीकाळीचा गावातील "शेजारधर्म" आता, बंद फ्ल्याटच्यामागे कधीच
गाडला गेलाय. सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारी, "चाळ
नावाची वाचाळ संस्कृती" जाऊन आता, घराची आणि
मनाची दारे आपल्यासाठीच उघडणारी परंतु इतरांसाठी बंद करणारी
"अपार्टमेंट" नावाची "कंपार्टमेंट संस्कृती" फोफावत चाललेय.
या बंद कंपार्टमेंटमध्ये जो तो स्वतःला आनंदी, सुखी, समाधानी
आणि जिवंत ठेवण्यासाठी धडपडतोय. हि त्याची "धडपड आहे की घुसमट आहे?" हेच मुळात
ज्याचे त्याला कळेनासे झालेय.


घरामध्ये नवरा, बायको आणि
मुले अशी सोयीची कुटुंब व्यवस्था. आई वडील तर "अडसर" ठरल्याने
केंव्हाचेच अडगळीत गेलेत. ज्यांना अनेक मुले होती ते मागच्या पिढीतील आईवडील
फुटबॉल सारखे जगतायत. ज्यांना एकुलता एक मुलगा आहे, त्यांना
एकतर जीव मुठीत घेऊन, आपल्याच माणसांत आश्रितासारखे जगावे लागतेय, नाहीतर
समवयस्क, समदुःखी जेष्ठ नागरिकांच्या समवेत "निवारा" शोधावा लागतोय.
त्यातूनही ज्या जेष्ठ नागरिकांना "पेन्शन" नावाचा सोबती आहे, त्यांचे
किमान आर्थिक हाल तरी होत नसावेत. पण ज्यांनी आपल्या अख्ख्या आयुष्याबरोबरच, सगळी
जमापुंजीसुद्धा मुलाच्या उच्च शिक्षणासाठी आणि मोठ्या शहरात घर घेण्यासाठी खर्च
केली, त्या रीत्या झोळीच्या मायबापांना प्रत्येक दिवस नव्या उमेदीने, आशेने (की
आशाळभूत ?) जगावा लागतोय.
" जगात चाललेले अन्याय, अत्याचार, अनागोंदी
आणि अराजक बघायला आणि बदलायला माझ्याकडे वेळ नाही, माझ्या
घराबाहेर समोरच्या, आजूबाजूच्या, इतरांच्या घरामध्ये आणि जगण्यामध्ये काय चाललंय हे पहायला, डोकवायला, विचारपूस
करायलाही माझ्याकडे वेळ नाहीये, माझ्या आईवडिलांकडे, नातेवाईकांकडे
आणि मित्रपरीवाराकडे जाण्यासाठी, भेटण्यासाठी आणि
घालवण्यासाठी माझ्याकडे वेळ नाहीये. वर्षातून एकदा मी १०-१५ दिवसांची रजा काढून हे
सगळे सोपस्कार, जबाबदा-या कर्तव्य भावनेतून पार पाडतो. नाहीतरी रोजच्या पैशांच्या मागे
धावण्याच्या शर्यतीतून जर मी माझे लक्ष विचलित केले तर मी या स्पर्धेतून बाहेर
नाही का फेकला जाणार? शिवाय, मी हे सारे पैसे जे कमावतोय, ते माझ्या
कुटुंबियांसाठीच तर नाही का कमावतोय? हे काय मी
माझ्यासोबत वर घेऊन जाणार आहे का? "
"तसेही, घरातील सगळ्यांच्या
सगळ्या गरजा मी वेळोवेळी पैसे देऊन पुरवतोच आहे की? घराचे
कर्जाचे हप्ते मी भरतोय, मुलांच्या नामांकित शाळेची अवाढव्य आणि अवाजवी फी मीच भरतोय, बायकोला
महागड्या वस्तू आणि दागिने घेऊन देतोय, मुलांना
नित्य नेमाने हॉटेलात जेवायला नेणे, बाहेर
फिरायला नेणे, त्यांना वेगवेगळी अत्याधुनिक महागडी खेळणी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू वेळच्या
वेळी घेऊन देतोय. आईबाबांच्या वृद्धाश्रमाचे पैसे भरतोय, त्यांच्या
देखरेखीसाठी स्पेशल नर्सही ठेवलेय. घरातील कामे करायला कामवाली बाई आहे, मुलांना
होम ट्युशन लावलेली आहे, गाडी चालवायला ड्रायव्हर आहे. माझे कर्तव्य मी चोखपणे पार पाडतोय की, अजून मी
काय करायला हवे?" असाच आजच्या बहुतांश नोकरदारांच्या संकल्पना आहेत.
नेमक्या याच संकल्पनांनी आपण वेढले गेलोय. ब-याचदा माझ्याकडे केवळ दोन शब्द
बोलण्यासाठी, मन मोकळे करण्यासाठी म्हणून जेंव्हा जेष्ठ नागरिक, पालक आणि
नोकरदार येतात ना तेव्हा एक समुपदेशक म्हणून मी अपुरा वाटू लागतो. माझ्याकडे पैसे
खूप आहेत पण, माझ्यासोबत मनापासून मनातील बोलणारे, मनापासून
मनातील ऐकणारे कुणीच नाही, असे जेंव्हा कुणाचे आईबाबा बोलतात ना, तेंव्हा
पैशांच्या मागे धावणा-या, त्यांच्या त्या मुलांची कीव मला करावीशी
वाटते.
येणा-या काळात बहुदा केवळ आपले मनातील ऐकण्यासाठी, आपल्याशी
बोलण्यासाठी लोक पैसे देऊन माणसे ठेवतील असे मला वाटू लागलेय. आता वेळेपेक्षा
पैशाला महत्त्व आले आहे आणि पैशामुळेच वेळेला महत्त्व आले आहे. तरीही, नव-याला
ऑफिसच्या कामांमुळे, बायको-मुलांशी, आईवडिलांशी बोलायला वेळ नाही. बायकोला, मुलांच्या
व्यापामुळे आणि घरातील पसारा आवरण्यामुळे आपल्याच नव-याशी आणि सासू-सास-यांशी
बोलायला वेळ नाही. मुलांनाही शाळा, क्लास, अभ्यास, टिव्ही, कंप्युटर
गेम्स आणि इतर छंदवर्गामुळे घरात आजीआजोबांना द्यायला वेळ नाही, त्यांना
सतत पाठीमागे लागणारी आई नकोशी वाटते, सकाळी
लवकर जाणारे आणि रात्री उशिरा येणारे, फक्त
शनिवार रविवारी भेटणारे आणि बाहेर फिरायला नेणारे ATM बाबा
त्यामानाने बरे वाटतात. आज्जी आजोबांच्या गोष्टींपेक्षा त्याना ओनलाईन
मित्रमैत्रिणींची गप्पाष्टके जास्त एन्टरटेनिंग वाटतात.
खरंच का, आपण एवढे बदललोय? आपल्याच माणसांसाठी आपल्याकडे वेळ नाहीये का......? असा बदल
काय उपयोगाचा......? आपल्या माणसांना आत्ताच वेळ द्या. नाहीतर, नंतर वेळ
निघून गेलेला असेल.
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
धन्यवाद.
प्रा. गुरुराज गर्दे.
"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प
".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
कार्यालय :- गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
मूळ निवास :- ८४१, दुर्गानिवास, बांदा, ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग. ४१६५११.
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
No comments:
Post a Comment