Saturday, August 29, 2015

बंध राखीचे..... बंध नात्यांचे.... "रक्षाबंधन" २०१५ चा लेख.........!!!







बंध राखीचे..... बंध नात्यांचे....  

आपल्या जन्माच्या अगोदरपासूनच आपल्या आयुष्यात विविध नात्यांचे बंध गुंफले जाऊ लागतात. आपल्या जगण्यातली विविध नाती आणि त्या नात्यांचे सप्तरंगी कंगोरे नवरसपूर्ण जगण्यासाठी, अनुभवण्यासाठी हेच रेशमी बंध कारणीभूत  ठरतात. आपलं जगणं समृद्ध बनवतात.
                आपल्या आयुष्यात असे काही काही दिवस येऊन जातात की, जे आपल्याला आपल्यातून नकळत दुस-या व्यक्तीच्या मनात नेऊन पोहोचवतात. त्या दिवसावर तुमचा हक्क नसतोच मुळी. तो दिवसच तुम्ही कुणाच्या तरी नावाने आयुष्यभरासाठी आगावू राखीव ठेवलेला असतो. अशात सर्वप्रथम असतो आपला स्वतःचा वाढदिवस. "वाढदिवस" हा आपला हक्काचा राखीव दिवस. नंतर लगेच क्रमांक लागतो तो रक्षाबंधन आणि भाऊबीजेचा. हा आपल्या लाडक्या बहिणीच्या नावे राखीव, मग दिवाळी पाडवा आपल्या बायकोच्या नावाने राखीव. तसे तर बायकोचा वाढदिवस, आपल्या लग्नाचा वाढदिवस असे काही अन्य दिवसही बायकोसाठी राखून ठेवावेच लागतात. किंबहुना तसे केलेत तरच, तुमची हक्काची बायको तुमच्यासाठी, वटसावित्री किंवा करवाचौथ हा दिवस राखून ठेवेल, अशी अपेक्षा तुम्ही करू शकाल. 
               तुम्ही तुमच्या बायकोकडून किंवा तुमची बायको तुमच्या कडून काही ना काही अपेक्षा करत असाल. पण, आपल्या भावाकडून  कोणतीही अपेक्षा न ठेवता, केवळ त्याच्यापर्यंत आपली राखी पोहोचवावी, म्हणून धडपडणारी व जीवाचे रान करणारी बहिण, प्रत्येक स्त्रीमध्ये असतेच. भावाने आपल्याला काहीही नाही दिले तरी चालेल, पण फक्त मला बहिण म्हणून आणि आपल्या या वेड्या बहिणीची राखी या दोनच गोष्टी मान्य कराव्यात, म्हणून आयुष्यभर झुरणारी स्त्री ही केवळ बहीणच असू शकते. आई आपल्या मुलावर जेवढे प्रेम करते, तेवढेच प्रेम, प्रत्येक स्त्री आपल्या भावांवर, एकूणच सगळ्या भावंडांवर करत असते. म्हणूनच आई नंतर नात्यांमध्ये दुसरा क्रमांक लागतो तो बहिणीच्या नात्याचा.

कृष्ण - सुभद्रा आणि कृष्ण - द्रौपदीच्या अनेक कथा आपण ऐकलेल्या आहेत. बहिणी-बहिणींमध्ये एकवेळ पटणार नाही. पण, बहिण- भावांमध्ये पटत नाही असे क्वचितच होते आणि त्याचे कारणही ब-याचदा समजूतदार बहिण हेच असते. आईनंतर आपल्या आयुष्यात आपल्यासाठी त्याग करणारी बहीणच असते. मोठी असेल तर ताई म्हणून आणि लहान असेल तर "बायो" म्हणून, ती आपल्या भावावर जीवापाड प्रेमाची उधळण करत राहते. भावावरील प्रेमापोटी सगळं काही हसत हसत सहन करत राहते. आईवडिलांची माया जरी मुलावर जास्त असली, तरी मुलगी कधीच त्याविषयी तक्रार करत नाही. उलट माझा भाऊ, माझा दादा, त्याचे कर्तृत्व, त्याचे यश, त्याचीच भरभराट या सर्व गोष्टींचा केवढा अभिमान तिच्या डोळ्यांत, चेह-यावर दाटून आलेला असतो, हे केवळ बघण्यासारखं सुख असतं. 

मोठ्या बहिणीच्या प्रेमाची पद्धत काही औरच असते. लहान बाळाची चाहूल लागली की तिला कोण आनंद होतो. तिच्या चिमुकल्या स्वप्नांची बाग बघता बघता बहरू लागते आणि तिच्या संपूर्ण आयुष्यालाच व्यापून टाकेल, अशा एका लाईफटाईम हिरोची तिच्या आयुष्यात एन्ट्री होते. तिच्या आयुष्यात आलेला हा दुसरा पुरुष, तिच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनतो, काळजाचा तुकडा बनतो. मोठेपणी तो कितीही वाईट वागला, चुकीचा असला, बिघडला, दुरावला, कृतघ्न झाला तरीही, प्रत्येक स्त्रीला या आपल्या काळजाच्या तुकड्याला तोडून फेकून देणे कधीच शक्य होत नाही. म्हणूनच तर प्रत्येक स्त्रीचा भाऊ हा तिच्यासाठी फारच संवेदनशील विषय असतो. ती एकवेळ आपल्या आईवडिलांविषयी ऐकून घेईल पण, तिच्या भावाबद्दल जरा जरी, कुणी काही वाईट वाकडे बोलले तरी, तिला येणारा राग, तिचा संताप हा तिच्या डोळ्यांतून आग ओकत बाहेर पडतो. 

मोठी बहिण ही "ताई" नसतेच, ती तर आपली छोटी आईच असते. कारण, आई आपल्याला आयुष्यभर पुरत नाही म्हणूनच तर देवाने आपल्याला आईची माया देणारी "ताई" दिलेय. मुळात ताई या शब्दातच मोठ्या बहिणीचा अर्थ सामावलेला आहे. आई नसली "रीही आई" ती ताई. आता माझे हे विश्लेषण साहित्यिकदृष्ट्या कदाचित मूर्खपणाचे असेलही. पण, नैतिकदृष्ट्या आणि भावनिकदृष्ट्या प्रत्येक बहिण-भावाला मात्र ते निश्चितच पटेल, असा मला ठाम विश्वास आहे. हीच मोठी बहिण "ताई" लहानपणापासून आपल्या भावाची काळजी घेते, त्याला जपते, संभाळते, त्याची सगळी कामे मुकाटपणे करते, त्याच्याशी खेळते, त्याला अभ्यासात मदत करते, सांभाळून शाळेत नेते, फिरायला नेते, घरी आणते, खाऊ घालते, झोपवते, आंघोळ घालते, कपडे धुते, आईवडिलांच्या रागापासून वाचवते, त्याचे सारे अपराध स्वतःच्या नावावर घेते, परीक्षेच्या काळात हीच ताई आपल्या लाडक्या भावासोबत अभ्यासासाठी रात्रभर जागते, त्याला नवीन वस्तू घेताना त्याच्या आवडी-निवडीची काळजी घेते, त्याच्या प्रत्येक क्षणांची साक्षीदार होण्यासाठी तिची किती धडपड चालू असते. त्याची स्विमिंगपूलमधली पहिली उडी, त्याची पहिली सायकल, त्याचे पहिले निवासी शिबीर, त्याचा दहावीचा पहिला पेपर, त्याच्या कॉलेजचा प्रवेश इथपासून ते त्याचा पहिला मोबाईल फोन, त्याचा पहिला जॉब, पहिला प्रवास, त्याला आवडणारी मुलगी, त्याचे प्रेम, त्याचे लग्न आणि बरेच काही.... ज्या ज्या घरांमध्ये अशी ताई असते, त्या त्या प्रत्येक घरातील भाऊ खरंच भाग्यवान. खरंच, अशी ताई लाभायलाही भाग्य असावे लागते. 

लहान बहिणीची तर त-हाच न्यारी. दादा हा तिच्यासाठी एक कल्पवृक्षच असतो. दादा हा तिचा "बापानंतरचा बाप" असतो. आपले सर्व लाड हौसेने पुरवून घेण्यासाठीचा तिचा हक्काचा आधार असतो. तिची छोटी छोटी स्वप्ने प्रत्यक्षात उतरविणारा आणि हवे असलेले सारे हट्ट पुरविणारा, देवदूतच असतो तो, त्या छोट्याशा गोड, नाजूक परीचा.  हाच दादा, तिला हसविण्यासाठी आपल्या पाठीवर घेणारा "घोडा" आणि लहानपणी तिच्या दप्तराचे ओझे घेणारा, आयुष्यभर तिच्या एका हास्यासाठी, वर्षानुवर्षे हसतमुखाने अपार कष्ट उपसणारा, तिचा लाडका "गाढव" बनतो. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी, हा दादाही आपले सर्वस्व पणाला लावतो. तिला जपतो, तिची काळजी घेतो, तिला जरासे जरी काही लागले, खरचटले की त्याचा जीव कासावीस होतो, आपल्या बहिणीला जपताना, त्याला स्वतःच्या जिवाचीही पर्वा नसते. अशा दादावर हक्काने आणि प्रेमाने आपला अधिकार सांगणारी धाकटी बहिण होणं, कुठल्या मुलीला आवडणार नाही? सिंहासारखा अभेद्य संरक्षण करणारा दादा, या लाडलीच्या प्रेमापुढे मात्र गरीब गाय होऊन जातो. त्याच्या जीवावरच "ती" वाट्टेल त्याच्याशी वाट्टेल तो पंगा घेऊ शकते. या लहान बहिणीचे प्रेम, हक्क, रुसवा, मागण्या हे सारे सारे न कुरकुरता सहन करणारा दादाच, तिचे सर्वस्व होऊन जाते. 

एवढे का वाटते, प्रत्येक स्त्रीला आपल्या भावाबद्दल...? तर त्याचे कारण म्हणजे, त्या दोघांचे सहजीवन. तिचे सारे बालपण त्याच्या सहवासात गेलेले असते. लहानातल्या लहान गोष्टींपासून ते मोठ्यातल्या मोठ्या घटनेपर्यंत सारे क्षण त्यांनी एकत्रितपणे घालवलेले असतात. ज्या वयात तिला हे जग कळत असतं, त्या वयातले तिचे जगच तर तो असतो. त्या जगात, तोच तिचा आधार असतो. तिचा सवंगडी असतो, तिचा सर्वांत जवळचा सखा असतो, तिचा श्वास, तिचा विश्वास आणि तिचा ध्यास असतो. तिचे  सारे विश्व त्याच्याभोवतीच तर गुंफलेले  गुंतलेले असते. मग मला सांगा, अशा आपल्या साथीदाराला आयुष्यभर विसरणे, कोणत्या स्त्रीला शक्य आहे. दुस-या स्त्रीच्या स्वाधीन होताना, नेमकी हीच गोष्ट आम्हां पुरुषांना कळत नाही की, आपली बायको लग्न होऊन आपल्या आयुष्यात आलेली असली तरी, आपल्यावर आभाळमाया करणारी बहिण आणि तिच्या प्रेमाचा आपल्यावर पहिला अधिकार आहे. तसेच जी मुलगी बायको होऊन आपल्या आयुष्यात आलेय, तिचाही जीव तिच्या भावात गुंतलेला असणारच आहे. पुरुष नेमका दोन्ही बाजूने बहिण म्हणून स्त्रीला ओळखायला कमी पडतो. आपण सा-याच पुरुषांनी, सर्वप्रथम आपल्याच बहिणीला आणि नंतर आपल्या बायकोमधल्याही बहिणीला ओळखायला शिकले पाहिजे.

रक्षाबंधन आणि भाऊबीजेला म्हणूनच एवढे अनन्यसाधारण महत्त्व आहे. या नात्याची लज्जतच काही और आहे. म्हणूनच ज्यांना बहिण नाही, अशा मुलांना आणि ज्यांना भाऊ नाही, अशा मुलींना या दिवसाला त्यांच्या काळजात एक रिती रिती जागा भरावयाची असते. 

अशा अपूर्ण नात्यांना या रक्षाबंधनच्या दिवशी पूर्णत्व देऊया. चला, एका तरी अशा बहिणीचा भाऊ बनूया. तिच्याकडून प्रेमाने राखी बांधून घेऊया. एकातरी भावाला राखी बांधूया. त्याला बहिणीची माया देऊ या. चला, हेच नात्यांचे रेशमी बंध जोपासूया. रक्षाबंधनाच्या या पवित्र नात्यासाठी आणि या नात्याच्या उत्सवासाठी, सर्व बहिण-भावांना मनःपूर्वक शुभेच्छा...!!! 
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!

धन्यवाद.

लेखक - प्रा. गुरुराज गणेश गर्दे. 
शैक्षणिक  समुपदेशक, करिअर  मार्गदर्शक  आणि व्याख्याता. 

ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.

मूळ निवास :- ८४१, दुर्गानिवास, बांदा, ता. सावंतवाडी. जि. सिंधुदुर्ग. ४१६५११.

© शब्दरचना. माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
What's Up :- 9422058288

© शब्दरचना - प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!! 

Sunday, August 23, 2015

" आमच्या बांद्यातली नारळी पौर्णिमा "

आमच्या बांद्यातली नारळी पौर्णिमा - 

श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच "नारळी पौर्णिमा". यालाच नारळी पुनव, श्रावणी पुनव किंवा सागरी पुनव असेही म्हणतात.  आजच्या दिवशी सागराला, त्याला जाऊन मिळणा-या नद्यांना थोडक्यात जलदेवतेला सन्मानाने नारळाचे अर्पण म्हणजेच "श्रीफळ" अर्पण करून मृग नक्षत्रापासून बंद झालेली मासेमारी आणि सागरी वाहतूक पुन्हा एकदा सुरु केली जाते.

शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून, त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला "नारळी पौर्णिमा" असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करावयाचे असले तरी, हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते "नारळी पौर्णिमा" वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेऊन नाचत, गात अतिशय आनंदाने मिरवणूक काढून समुद्रकिना-यावर, नदी किना-यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून, दर्या देवताला नारळ समर्पण करतात. प्रार्थना म्हणतात, की “ हे पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा, शांत हो आणि तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.”

समुद्राकाठी रहाणार्‍या व प्रामुख्याने मासेमारी करणार्‍या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्ती सोन्याचा नारळ अथवा नुसता नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात, नदीत जातात.

आमच्या बांदा गावाला नारळी पौर्णिमेची पूर्वापार चालत आलेली एक विशिष्ट अशी परंपरा आहे. तशी ती कोकणातल्या ब-याचशा गावांना थोड्याफार फरकाने असतेच म्हणा. पण आमच्या बांदा गावचा आणि एकूणच कोकणातील, पावसाळ्यानंतर म्हणजे मिरगानंतर येणारा पहिला मोठा सामुदायिक सण म्हणून, या नारळी पौर्णिमेच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे. कुणबी (शेतकरी) आणि वाणी (व्यापारी) समाजाचे बाहुल्य असलेल्या आणि पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या, आमच्या शेतीप्रधान गावात दरवर्षी साधारणतः ६-७ जून ला हमखास मिरग लागतोच. मिरगाची तयारी पंचक्रोशीतील शेतकरी आणि व्यापारी वर्ग आपापल्या परीने सुरु करतो.

म्हणजे, चाकरमान्यांना हास-या चेह-याने पुणा - मुंबईला कोकणमेव्यासोबत खुशी-खुशी धाडून दिले की, सगळे गाव आपल्या पावसाळ्याच्या तयारीला लागते.  मे महिना संपताना आणि जून महिना सुरु होता होता, आमचा कोकणातला शेतकरी अजूनही पारंपारिक, लोखंडी नांगर धवडाकडे भट्टीत घालून आणतातच. सोमवारी म्हणजेच बाजाराच्या दिवशी मेणकापड, खोळी, गमबुट, बी बियाणे, बैल आणि जोताचे सामान, घरचा किराणा माल आणि मुलांच्या शाळेचे साहित्य खरेदी करतात. कारण मग पुढे २-३ महिने त्यांना संततधार पडणा-या पावसातून आणि शेतीच्या कामातून या सगळ्याला वेळच मिळत नाही. तसं महाराष्ट्रातील इतर दुष्काळी भागातील शेतक-या सारखा आमच्या कोकणातल्या शेतक-याला कधी पावसाने दगा नाही दिला....!! कदाचित कोकणातील शेतकरी निसर्गाच्या अजूनही तितकाच जवळ आणि निसर्ग पूजक असल्यामुळे असेल म्हणा. त्यामुळेच, हा नारळी पौर्णिमेचा सण, याच निसर्ग पूजनाचा एक भाग आहे.

इकडे गावातील ५०% शेतकरी वर्ग शेतीत गुंतलेला असतो, तर उर्वरीत ३०% वाणी समाज, हा या सर्वांच्या मौन्सूनपूर्व बेगमीच्या मदतीला तयार असतो. जूनच्या १ तारखेपासूनच गावातील, बाजारपेठेतील दुकाने अभ्यासाच्या नवीन वह्या, पुस्तके, दप्तरे, शालेय साहित्य आणि छत्र्या, रेनकोट, मेणकापड, खोळी यांच्या विविध प्रकारांनी नटून सजून जातात. गावातील अनेक व्यापारी वसंत ऋतूतील, उन्हाळ्याच्या सुटीतील नारळ, सुपा-या, कोकम, रातांबी, काजू, फणस यांसारख्या कोकणी मेव्याच्या व्यवसायातून मोकळे झालेले असतात. पण "जरासा आळसावतो," असं म्हणूनही, त्यांना आळस घ्यायला फुरसत नसते. नारळ, सुपारी आणि काजूची पोती भरभरून, ट्रक लोड करून गावाच्या वेशी ओलांडतात न ओलांडतात, तोच या मौन्सूनपूर्व बेगमीच्या मालांचे ट्रक गावच्या बाजारपेठेत दाखल होतात. गावातील विविध दुकानांमधून नवीन साहित्याची विभागणी, प्रत्येकाच्या दुकानातील मांडणी आणि त्याची दरनिश्चिती यात मिरग कधी येतो ते या व्यापारी वर्गाला कळतच नाही. मग पुन्हा सुरु होतो वर्षा ऋतूतील व्यवसायाचा सारीपाट.....! "जरासा आळसावतो" असं म्हणणारे मग पुढे २-३ महिने मान वर करूनही बघत नाहीत.

अशातच जेष्ठ जातो, आषाढ सरतो, आणि श्रावण सुरु होतो. नाही म्हणायला आषाढातील मोठी एकादशी गावात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, पण त्याला वरुणराजाची जोरदार हजेरी असतेच हमखास. म्हणून मग गावात ज्याला जसे जमेल तसे आणि त्या वेळेत जो तो मुसळधार पावसात हळूच येऊन गावातील विठ्ठल मंदिरात विठोबाचे दर्शन घेऊन जातो.... शेतकरी राजा तर रात्रीच्या दिंड्यांना आणि उसळीच्या प्रसादाला न चुकता हजर असतो, खरीपाच्या शेतकामांत तेवढाच विरंगुळा.... मग तशातच श्रावण येतो सणासुदीचे दिवस घेऊन.  आकोबा कोकोबा पुजताना गावातील मुली, तरुणी आणि महिला फुगड्यांचे फेर धरू लागतात, नागपंचमीच्या सणाला मातीच्या नागांचे पूजन होते घराघरात, श्रावण सोमवारी गावच्या देवाला बांदेश्वराला आणि पाटेश्वराला गावातील सुवासिनी शिवमूठ वाहायला बाहेर पडतात, मंगळागौरीला नव्या नि जुन्या वशेळ्यांच्या मंगळागौरीच्या रात्री जागू लागतात. पण, सबंध गावाचा सामुदायिक सण म्हणून मान मिळतो ते "नारळी पौर्णिमेला"च ....!!

सकाळी ग्रामदैवताच्या देवळात दुपारच्या पालखीची तयारी सुरु होते. गावाचे गावकरी, मानकरी, व्यापारी आणि पुजारी असे सारे, ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्याच्या तयारीत गुंततात. इथे गावातील सारे लहान थोर, सगळ्या धर्मांचे, सगळ्या जाती पातीतील, सगळ्या स्तरांतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या सगळ्यात, गावातील देवळाचा मान असणारे गावकांर अर्थातच, सर्वांच्या पुढे असतात. ते ग्रामदैवताची म्हणजे बांदेश्वराची पालखी सजवतात. गावचा देव नारळीपौर्णिमेला स्वतः पालखीत बसून दिमाखात नदीवर जातो आणि नदीच्या रूपातील जलदेवतेला "सोन्याचा नारळ" अर्पण करतो ही ती प्रथा...

" हा सोन्याचा नारळ खरंच सोन्याचा असतो का......?" हा प्रश्न मी लहानपणी माझी आई, माझे बाबा, माझे मित्र, देवळातील भटजी, गावकांर, भजनी मंडळी, पालखीचे मानकरी अशा अनेकांना विचारलेला मला आठवतोय. त्या सर्वांची उत्तरे वेगवेगळी होती, पण श्रद्धा मात्र एकाच होती. तो सोन्याचा नारळ काही मला शेवटपर्यंत बघायला मिळाला नाही कधी लहानपणी, पण, मोठा झाल्यावर त्यामागची प्रत्येक बांदेकाराची भावना मात्र कळली, बघायला मिळाली. 

ग्रामदैवताच्या देवळापासून ते नदी पर्यंतच्या प्रवासात "देवाचा प्रसाद" म्हणून मानाचा नारळ गावातील इतर महत्वाच्या देवांच्या ठाण्यांनाही मिळत जातो. मग ती घोडेमोडणी असो, मोर्येवाड्यातील मुसलमान मुजावरांचा पीर असो, विठ्ठल मंदिरातील विठोबा असो, किंवा आळीतील, पोलीसस्टेशनातील पाटेश्वर असो.....!!!  देवाचा मानाचा नारळ  गावक-यांच्या मनातील जातीपाती, देवा धर्मांच्या सीमा ओलांडून अख्ख्या गावाला वैश्विकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतो. याच विश्वबंधुत्वाच्या संदेशात, हा भव्य पालखी सोहळा वाजत गाजत या सर्व ठाण्यांना भेटी देत देत नदी पर्यंत येऊन पोहोचतो.

यात पालखीचे भोई व्हायचा मान गावकांरांचा.... गावातील मोर्ये, सावंत भोसले आणि परब यांच्या पिढ्यानपिढ्या देवाची सेवा करतायत... पालखीतील भजन, गाणी म्हणण्याची आणि वादन करण्याची सेवा गावातील प्रत्येकजण आपापल्या परीने आणि कुवतीनुसार करण्याचा प्रयत्न करतो. देवाची तळी ( आरती) धरायचा मान भटाचा.......!!  पूर्वी ही आरती गंपू वाटवे कडे असायची. माझ्या लहानपणी त्याच्या बरोबर या पालखीतून चालताना, मी सारखा त्याच्या मध्ये मध्ये येतो म्हणून, त्या गंपू भटजींचे किती तरी धपाटे मी खाल्लेयत. पालखीच्या पुढे ताशा वाजवायचा मान मुसलमान मुल्ला घराण्याकडे. माझ्या लहानपणापासून बांदेश्वराच्या देवळासमोर आणि पालखीसमोर न चुकता नेमाने ताशा वाजविणारे, इस्माईल मुल्ला या माझ्या मित्राचे वडील, आजही माझ्या डोळ्यांसमोर उभे रहातात. किंबहुना, त्यांच्या ताशांच्या त्या आवाजावरूनच तर, गावातील घराघरांतून पसरलेल्या, आमच्यासारख्या "वानरसेनेला" या पालखीच्या सोहळ्याची चाहूल लागायची...

ही पालखी गावातून निघाली की, गावातील प्रत्येक घरातील कर्ता पुरुष, आपल्या घरचा नारळ नदीला अर्पण करायला, त्या पालखी सोहळ्यात नारळासह सामील होत जातो. जसजशी पालखी पुढे पुढे निघते, तसतशी या पालखी मार्गावरील घराघरातील सुवासिनी देवाच्या पायावर पाणी घालायला, कळशी घेऊन पुढे होतात. वाटेवर रांगोळ्या घातलेल्या असतात, घातल्या जातात. देवाचे दर्शन घेतले जाते आणि नदीवर जाणे शक्य नसेल तर आपल्या घरचा नारळ गावकारांकडे जमा केला जातो. पालखी महाजन आळी, बाजारपेठ, विठ्ठल मंदिर, मोर्येवाडा असे करत करत पोलीस स्टेशनमधील पाटेश्वराला जाऊन, खालच्या आळीतून नदीकिनारी पोहोचते. 
तिथे आधीपासूनच तयारीत असलेले तारी आणि तेल्यांच्या होड्या पाण्यात जायला तयारच असतात. गावातील अनेक घरांतून अर्पण करण्यासाठी आलेले नारळ जेंव्हा नदीत टाकले जातात, तेंव्हा होड्यांच्या आणि नारळ पटकावणा-या पोरांच्या पोहण्याच्या स्पर्धा असतात. 

नदीकिनारी पालखी आल्यावर, मग देवाची आरती होते. पावसाच्या कृपेसाठी, बळीराजाच्या सुखासाठी, धनाधान्याच्या समृद्धीसाठी, बाजारपेठ आणि व्यापार उदिमाच्या उत्कर्षासाठी आणि एकूणच संपूर्ण गावाच्या भल्यासाठी गा-हाणे घातले जाते.  नदीची, समुद्राची, जलदेवतेची प्रार्थना केली जाते आणि ग्रामदैवताचा "मानाचा नारळ" सर्वप्रथम नदीला गावकारांकडून आणि प्रमुख ग्रामस्थांकडून अर्पण केला जातो. आणि मग सुरु होते, नारळ नदीच्या पाण्यात दूरवर, अधिकाधिक लांब फेकण्याची स्पर्धा....!!! नदीपात्रात अनेक नारळांचा जणू पाऊसच पडू लागतो. बघता बघता नदीचे पात्र तरंगत्या नारळांनी भरून जाते. स्पर्धा, चढाओढ सुरु होते होड्या पळविण्याची आणि अधिकाधिक नारळ गोळा करण्याची. सुमारे तासभर चाललेल्या या चढाओढीने, बघणा-यांचा उत्साह आणि जोश सहभागी पोहणा-या स्पर्धकांचा हुरूप वाढविण्यास कारणीभूत ठरतो. या स्पर्धा बघणे, अनुभवणे आणि यात सहभागी होणे हे सारे, म्हणजे आमच्या कोकणातील गावागावांतून भरणारे ऑलिंपिकच.!!! प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष आणि प्रचंड स्पर्धा....!!! 

पालखी परतीच्या वाटेवर येते, तेंव्हा सगळा गाव प्रसाद घ्यायला गोळा झालेला असतो. नारळी पौर्णिमेच्या "शिरणीचा प्रसाद" खाण्यात एक वेगळीच गम्मत असते. हे शिरणीचे तुकडे घरी आणून, नारळीभात करताना त्यात घातले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व बहिणीकडून राखी बांधून घेणे आणि केवळ नदीवर जाऊन दंगा करणे, असं मानणा-या शाळकरी मुलांचे दिवसभराचे सगळे कष्ट विसरायला, हा नारळीभातच भाग पाडतो. नारळी पौर्णिमेची सकाळ आमच्या गावात हातांवर बांधलेल्या राख्या मिरविण्यात, तर संध्याकाळ खांद्यावर बांदेश्वाराची पालखी मिरविण्यात जाते. अशी ही बांद्याची अनोखी नारळीपौर्णिमा माझे बालपण आणि अवघे जीवनच समृद्ध करून गेलेय. 

"ही सगळी गम्मत अनुभवायला मी नारळीपौर्णिमेला बांद्यात असायला हवा होतो", अशी हुरहूर बांद्यात बालपण घालविलेल्या आणि आता गावापासून दूर असलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक बांदेकाराला नाही वाटली, तरच नवल......!!!

अशी ही नारळी पौर्णिमा आमच्या बांद्यातच येऊन, तुम्हीही अनुभवा एकदा .......... !! 
यंदाच्या, या वर्षीच्या नारळी पौर्णिमेचे तुम्हांला आत्ताच निमंत्रण........!!!

प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!

धन्यवाद.

प्रा. गुरुराज गर्दे.

"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प ".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.

माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com |aaryaads@yahoo.com
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!


छायाचित्र सौजन्य :- परममित्र श्री. योगेशजी काणेकर, बांदा.








Monday, August 17, 2015

स्वातंत्र्य की स्वैराचार...?

स्वातंत्र्य की स्वैराचार...?

आपण स्वतंत्र झालो आहोत खरे, पण आपण खरोखरच प्रगल्भ झालो आहोत का....? मिळालेले स्वातंत्र्य आपण उपभोगत नसून ओरबाडत आहोत, असं वाटतं कधी कधी. हे जे मिळवलंय ना, ते जर योग्य पद्धतीने नाही ना टिकवले, तर आहे हेही थोड्याच दिवसांत पुनश्च एकदा गमाविण्याची पाळी लवकरच आल्यावाचून राहणार नाही.

भारतीय स्वातंत्र्यात मोलाची भूमिका बजाविणा-या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आणि देशभक्तांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलंय ते केवळ आणि केवळ उपभोगाण्यासाठीच. परंतु, "स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे," हे कदाचित आपण सारे विसरत चाललो आहोत की काय? असे वाटावे, इतकी या देशाची परिस्थिती बिकट होत चाललेली दिसून येते. "देशाने आपल्यासाठी काय केले, याहीपेक्षा आपण देशासाठी काय केले. हे तपासावे," असे सांगत, स्वातंत्र्यदिनी सार्वजनिक ठिकाणावरून धादांत खोटे बोलणारे नेते आणि तथाकथित विचारवंत यांनी हेच वर्षानुवर्षे आपल्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न करून, सोयीस्कररित्या आपापली जबाबदारी ही अलगद सर्वसामान्य नागरिकांच्या खांद्यांवर आणि समाजाच्याच अंगावर बिनदिक्कतपणे टाकून दिलेली आहे.

'जगणे आणि मरणे नेमके काय असते?,' हे कळण्यासाठी एकदातरी भारतीय सैनिकाला जवळून अनुभवले पाहिजे, त्याला जाणून, समजून उमजून घेतले पाहिजे. अशा सैनिकांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांना देशसेवेनंतर झगडावे लागते. 'या झगड्यापेक्षा सीमेवरची लढाई परवडली,' असे या शूर जवानांना नक्कीच वाटत असावे. जो बळीराजा सा-या देशाला अन्न देतो, त्याच बळीराजाला खायला एकवेळचे अन्न नाही. ज्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले जावेत असे वाटते, त्यांनाच तर सुलतानी आणि आस्मानीही संकटांशी एकाचवेळी झुंजावे लागतेय. एसीमध्ये बसून शेतक-यांच्या प्रश्नांवर काथ्याकूट करणा-या, बळीराजाच्या आत्महत्येवर अभ्यासपूर्ण भाषण ठोकणा-या, शिवाय वर सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगाची फळे चाखणा-या सुखवंतांना, या बळीराजाच्या घामाची फळे आणि अश्रूंची किंमत सहजासहजी कशी कळेल.? शेतकरी, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार, उपेक्षित आणि आर्थिक दुर्बल घटकांना जगण्याचे तरी स्वातंत्र्य आहे का....?

आपल्या समाजाचे एक मात्र बरे आहे की, आपण चांगल्याचे श्रेय घ्यायला तत्पर असतो. पण, अपयशाचे खापर मात्र दुस-याच्या माथी मारून मोकळे होतो. आपल्या हक्कांसाठी तावातावाने बोलतो, पण कर्तव्याची जाणीव करून दिली की लगेच वरमतो. सरकारकडून, लोकप्रतिनिधींकडून खूप खूप चांगल्या अपेक्षा ठेवतो, आणि चांगल्या व्यक्तींना निवडून देण्याऐवजी मात्र, वाईट प्रवृत्तींनाच मतदान करतो. काही सुजाण आणि अतिकर्तव्यदक्ष नागरिक तर मतदानाच करत नाहीत. राजकीय व्यवस्थेवर सडकून टीका करणारे, विचार मांडणारे प्रामाणिकपणे सर्वसामान्यांसाठी लढणारेच नेमके, निवडणुकीत तोंडघशी पडतात आणि लाखो करोडोनी पैसा वाटणारे, मतदार विकत घेणारे, दहशत माजविणारे, गुंडगिरी आणि मुजोरीचे घसघशीत दागिने अंगभर घालून, उजळमाथ्याने फिरणारे दादा, भाऊ, आबा, नाना, अण्णा, तात्या, साहेब, सरकार, राजे हेच निवडून येताना दिसतात. यांनाच सत्तेत निवडून देण्याचं स्वातंत्र्य मिळालंय, नाही का आपल्याला..? स्वतःच्या घरातील कचरा बाहेर सार्वजनिक ठिकाणी नेऊन, इकडे तिकडे हळूच बघून, गपचूपपणे हातातील कच-याची प्लास्टिक पिशवी भिरकावून देताना, याच निष्क्रीय सर्वसामान्य माणसांना आपण राजकारणात मात्र ही घाण अशीच भरतोय, याची पुसटशी देखील कल्पना करता येणे शक्य आहे का.....? आपल्याला सार्वजनिक ठिकाणी घाण करण्याचे, नाही का स्वातंत्र्य मिळालेय..?

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, घाण करणे, सार्वजनिक मालमत्तेची नासधूस करणे, भावना भडकविणा-या लोकांची गुलामगिरी करणे, अप्रामाणिकपणा अंगी बाणवणे, इतरांशी खोटेपणाने जगणे, भ्रष्टाचार, लाच देणे घेणे यांना विरोध न करता प्रोत्साहन देणे, सिग्नल न पाळणे, अपघातग्रस्तांना मदत न करणे, कामावर वेळेवर न पोहोचता, काम संपायच्या आधीच लवकर निघणे, पैशांत सा-या गोष्टींची तुलना करून दुर्बलांवर रुबाब दाखविणे, सार्वजनिक जबाबदारीच्या नावाखालीही केवळ स्वतःचीच सोय बघणे आणि निसर्गाची नि पर्यावरणाची अनन्वित हानी करणे, या आणि अशा अनेक गोष्टींचे अनिर्बंध स्वातंत्र्य आपल्याला मिळालेले आहे, अशीच समजूत बहुदा सा-यांची झालेली दिसतेय. मग या अशा परिस्थितीत देशसेवा नक्की कोणती करायची ? कशी करायची ? कुणी करायची ? कधी करायची ? हाच संभ्रम, या सुजाण भारतीय नागरिकांच्या मनात निर्माण होतो.

प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रांत, चढाओढ नि जीवघेणी स्पर्धा लागलेय. स्वतःच्या उत्कर्षापुढे, इतरांचा, समाजाचा, पर्यायाने देशाचा उत्कर्ष विचारात घ्यायलाही आज नेमका वेळ नाहीये या नव्या भारतीयांकडे. गलेलठ्ठ पगार, स्वतःची नोकरी, घराचे हप्ते, दोनचाकी- चारचाकी गाडीचे कर्ज, मुलांची शिक्षणे, रोजच्या खर्चाचा ताळमेळ, हॉटेलिंग, मल्टिप्लेक्समधील करमणूक आणि विकेंड सेलिब्रेशन यात गुरफटून गेलेल्या नवयुवकांच्या व्हॉटस् अप् आणि फेस्बुकात भरभरून वाहणारे देशप्रेम बघितले की वाटते, देशासाठी लढणा-या आणि अमर हुतात्म्यांना स्वतःची स्मृतीस्थळे ही पर्यटनस्थळे झालेली पहावयास मिळणे, हे किती दुर्दैवी नाही का.....?

रोज आपण आपल्या आयुष्यात साधे साधे नियम पाळून, सार्वजनिक संकेत पाळूनही देशसेवा करू शकतो, हे वेळेवर आपण सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे. घराघरांतून चालणारे टी.व्ही., केबलचे मुक्त प्रक्षेपण, कॉम्प्युटरचे वाढते अतिक्रमण, दहीहंडी, गणेशोत्सव, नवरात्र, होळी, आपले लग्न समारंभ तसेच, एकूणच सर्व सणांचे आणि परंपरांचे सार्वजनिक बिभत्सरूप पाहता, आपल्या भावी पिढीसमोर आपण याच अराजकाचे, स्वैराचाराचे उदाहरण तर नाही ना घालून देत आहोत, हा अंतर्मुख करणारा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.

दुस-याच्या घराला आग लागलेली असताना, आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही. पण, तीच आग केंव्हा आपल्यालाही गिळंकृत करेल, हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्या घराघरांपर्यंत ही आग येऊन पोहोचतेय. आत्ताच यावर गंभीरपणे विचार केला नाही, तर प्रश्न फारच गंभीर होऊन जातील. म्हणूनच, वेळीच स्वैराचाराला रोखून, स्वातंत्र्याची पताका अभिमानाने पुढच्या पीढीच्या हाती सोपवायची असेल, तर स्वतःमध्येच छोटे छोटे बदल घडवून आणूया आणि देश घडवूया...!!!

जयहिंद.

दि. १५ ऑगस्ट २०१५.

प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!

धन्यवाद.

प्रा. गुरुराज गर्दे.

"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प ".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.

माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/

What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com |aaryaads@yahoo.com

Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor

प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!

Thursday, August 13, 2015

" गटारी स्पेशल " प्रा. गुरुराज गर्दे यांची संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड गाजलेली एक हटके " गटारी स्पेशल " हजल आज पुन्हा, तुम्हां Face Book आणि Whats Up च्या रसिक वाचकांसाठी. ("चांदणझुला" मधून... ) Mobile - 9021501924 / 9422058288
गटारी साठी माझ्या सर्व मित्रांच्या खास आग्रहावरून ही " गटारी स्पेशल " हझल लिहिलेली आहे..
माझे परमस्नेही आणि गझलगुरू गुरुवर्य इलाही जमादार यांची मूळ गझल "चांदण्यासाठी असे हे जागणे आता पुरे...." तसेच माझे आणखी एक प्रेमळ स्नेही सुप्रसिद्ध गझलनवाज गझलगायक भीमराव पांचाळे यांनी स्वरसाज चढविलेल्या या गझलेचे विडंबन म्हणजे ही हझल ---- (या दोन्ही मान्यवरांची मनापासून क्षमा मागून...)
बाटली हातात धरुनी, झिंगणे आता पुरे, या गटारीला गटारी, लोळणे आता पुरे. हा अवेळी पावसाळा, लागतो ओला कसा? चार महिन्यांचा हा दुरावा, भोगणे आता पुरे. बायकोला सांगुनी मी, सटकलो आहे खरा, परतुनी जाता घरी त्या, अडकणे आता पुरे. दोस्त जमुनी ठरवती हे, कोंबडा कापायचा, तांबड्या रस्श्याविना ते, चाखणे आता पुरे. बोळकांडी तुडवुनी मी, बार सारे शोधले, शोधण्यासाठी पिलेली, उतरणे आता पुरे... जाग सा-यांना असावी, फोडतो मी बाटली, कोरडा हा पेग नुसता, मारणे आता पुरे.. राहवेना घेतल्याविण, दोन घुटके प्यायचे, पाहुनी चकण्यास खाता, थांबणे आता पुरे. दोस्तहो, तुमच्या कृपेने, रिचवितो आहे पुन्हा, जास्त होता पेग माझे, उलटणे आता पुरे... हे पहा मी मात्र आता, ग्लास उलटा ठेवला, आग्रहास्तव दोसतीच्या, ओतणे आता पुरे... आमची झाली गटारी, त्रास त्यांना जाहला, भुंकणा-यांनो असे हे, भुंकणे आता पुरे.... ----- स्नेहसखा गुरुराज. Mobile - 9021501924 / 9422058288 प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!! माझी कोणतीही गझल / कविता आवडली तर कृपया, माझ्या नावासह व नंबरसह फॉरवर्ड करावी. ही नम्र विनंती. प्रा. गुरूराज ग. गर्दे. शैक्षणिक सल्लागार - समुपदेशक, व्याख्याता. पत्ता :- डीएसके विश्व, धायरी, पुणे. सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924 What's Up :- 9422058288 Email :- gururajgarde@gmail.com Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor

Wednesday, August 5, 2015

“मला भेटलेली देवमाणसे....” या लेखमालेतील पहिला लेख

"आपा नार्वेकर" आमच्या बालपणातील एक अवलिया...!!!

आमच्या लहानपणी आम्हांला आनंद देऊन जाणारी अनेक लोकं आपल्या आठवणीत राहतात आयुष्यभर. ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपले बालपणीचे विश्व, आयुष्य बहारदार, रंगीत आणि समृद्ध करून जातात. माझ्या आयुष्यात माझा बालपणीचा काल ज्यांनी ज्यांनी सुखाचा केला त्यापैकीच एक म्हणजे हा आपा नार्वेकर.

एक जुनी सायकल, त्याच्या मागे कॅरियरवर लावलेले एक भलेमोठे चुरमु-याचे पोते, पुढे ह्यांडलला लटकवलेली एक पिशवी, अंगात पांढरा मळलेला बुशकोट आणि खाली खाकी मळखाऊ हाफपँट अशा वेशात, दुपार नुकतीच कलून संध्याकाळ व्ह्यायच्या वेळेला "चणे, शेंगदाणे, चुरमुरेsss" अशी आरोळी आली, की मी आशाळभूत नजरेने आमच्या घराच्या गेटवर धाव्वत येऊन, आमच्या आवाठात आलेल्या नि वयाची तिशी ओलांडलेल्या या आपा नावाच्या " काबूलीवाल्या" कडे अनिमिष नजरेने पाहत असे...

मला आठवतंय, याला मी पाहिल्यांदा पाहिला, जेंव्हा मी ३-४ वर्षांचा असेन. आषाढी एकादशीला, गावातील विठ्ठल मंदिराच्या बाहेर एका बाजूला दहा बाय दहाच्या पथारीवर बसून, तुळशी, उदबत्ती, फुले आणि गरम गरम शेंगदाणे विकत बसलेला.. माझे वडील मला घेऊन देवळात गेलेले.. तुळशी, फुले, उदबत्ती बाबांनी घरूनच नेलेली. त्यामुळे " सर, कायतरी घेवा मो.." असं आपाने म्हटल्यावर, माझ्या बाबांनी हसून त्याला "नंतर येतो" असा इशारा केला आणि ते मला घेऊन देवळात गेले.

देवळात त्यांनी विठोबाकडे काय मागितले माहित नाही, पण मी मात्र, 'बाहेर बसलेल्या त्या आपाकडील गरम गरम शेंगदाणे बाबांनी मला घेऊन द्यावेत', असे देवाला सांगितले. बाहेर आलो, बाबांनी निघताना आपाला २ रुपयाचे शेंगदाणे, २ रुपयाचे खारेमोरे आणि १ रुपयाचे चुरमुरे द्यायला सांगितले मात्र, माझा विठ्ठलावर प्रचंड विश्वास बसला आणि आपाबद्दल प्रचंड कुतूहल वाटू लागलं...

त्यानंतर तो आवाठात संध्याकाळी येण्याची मी जणू वाटच बघू लागलो... रोज शेंगदाणे, चणे किंवा फुटाणे घ्यावेत असे मला नेहमी वाटायचे. मी तसा बाबांकडे हट्टही करायचो, पण ब-याचदा मला शेंगदाणे, चणे - फुटाण्यांपेक्षा बाबांचे फटकेच मिळायचे. आपा मात्र, " राजू, तुका शेंगदाणे व्हये मां..? हे घे.. " असे म्हणून माझ्या इवल्याशा हातावर चार सहा दाणे टेकवून "चणे, शेंगदाणे, चुरमुरेsss" अशी आरोळी देत पुढे निघून जायचा.

तसा तो आमच्या घराजवळच रहायचा. बाजारात त्याचे एक छोटेसे पडीक असे दुकान होते.त्याच्या वाडवडिलांच्या कालापासून चालवलेले.बहुदा पूर्वीच्या काळी ते जोरात चालत असावे. पण, मी पाहत आलो तेंव्हापासून ते पडीकच दिसायचे... या दुकानात आपा चणे, फुटाणे शेंगदाणे, चुरमुरे, भेळ, त्याने स्वतःच्या घरात बनविलेले, गुळाच्या पाकातील चुरमु-याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, जाड आणि बारीक शेवाचे खडखडे लाडू, बुंदीचे लाडू असे अनेक प्रकार विकायला ठेवत असे. नंतरच्या काळात त्याला लेज आणि कुरकुरे विकायला दुकानात ठेवावे लागले ते केवळ नव्या पिढीची चव आधुनिक झाली म्हणून. नाहीतर आमच्या बालपणीच्या या स-या चावी त्यानेच समृद्ध केल्यात...

या आपाला आम्ही नेहमी एकेरीच बोलवायचो.. पूर्ण गावानेच त्याला एकेरी संबोधन केलेले.. मला आता वाटतं, फक्त आपाची बायको आणि त्यांची मुले एवढेच काय ते, त्या बिचा-याला आदरार्थी संबोधन करत असावेत.. नाहीतर बाकीचे सगळे लहान मोठे त्याला "ए आपा" अशीच हाक मारायचे... तो म्हातारा होईपर्यंत तो कधी "अहो" झालाच नाही. शिवाय त्यालाही ते फार प्रेमाचे वाटायचे हे विशेष ..

जत्रेच्या काळात हा आपा गावातील प्रत्येक जत्रेला आणि आजूबाजूच्या प्रत्येक गावातील जत्रेला आपले चणे, शेंगदाणे, चुरमुरे, फुटाणे आणि खेळण्यांचे दुकान लावायचा. मी माझ्या "आयुष्यातील पहिली भेळ" याच महामानवाच्या जत्रेतील पथारीवजा दुकानात खाल्ली. ती आंबटगोड चवीची भेळ नि खारट-तिखट चव माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा खाल्ली तेंव्हा त्या रात्री मी किती आनंदात झोपलो होतो हे आजही मला स्पष्टपणे आठवतेय.. मग पुढे बरीच वर्षे तीच "आपाची भेळ" माझ्या बालपणातील आणि शालेय जीवनातील एक अविभाज्य भाग बनून राहिला. आजवर मी अनेक शहरात अनेक ठिकाणी अनेक नामांकित नि नावाजलेली भेळ खाल्लेय पण "आपाची भेळ" काही औरच...!

हा आपा सुरुवातीला रोज आणि मग पुढे पुढे दोन तीन दिवसातून एकदा तालुक्याच्या गावी, सावंतवाडीला सायकलने जाऊन ताजे ताजे चुरमु-याचे पोते आणायचा. बांदा ते सावंतवाडी बरोबर बारा किलोमीटरचे अंतर. आता कमी वाटते, पण तेंव्हा, माझ्या बालबुद्धीला ते प्रचंड वाटायचे. हा माणूस रोज एवढी सायकल चालवतो, वाडीला जातो आणि दुपारच्या आत परत येतो हे सगळेच अचाट आणि भव्यदिव्य वाटायचे... आवाठात आणि फारच फार तर बांदेश्वरापर्यंत सायकल चालवणारे आम्ही, सावंतवाडी म्हणजे आमच्या दृष्टीने इंग्लिश खाडीच पोहणे...!

या आपाने मध्यंतरी शाळेकडे मधल्या सुट्टीला यायचे सुरु केले होते. गावातील सिनेमाच्या तंबूकडे आपा नेहमी असायचा. इंटरव्हलला " एंगे लाडूsss एंगे लाडूsss" करत आपल्या मुलाला हळूच तंबूत पाठवायचा. आम्ही मोठे होऊ लागलो होतो, तोपर्यंत गावात फुटाणे, चणे, शेंगदाणे, चुरमुरे यांची दोन चार नवी दुकाने सुरु झाली होती. मोरे, साटेलकर असे या क्षेत्रातले नवे स्पर्धक आल्यावरही अनेक आवाठातल्या लहान मुलांना आणि गावातील जाणत्यांना मात्र, या फिरस्त्या आपाच्या सायकलीचीच क्रेझ होती. आम्ही मात्र कधी कधी आपाला टाळून या नव्या चकचकीत दुकानांमधून डोकावायचो. आपले ग्राहक या नवीन दुकानात जातात, हे ओळखूनही या माणसाची विनम्रता कधी ढळलेली मी पहिली नाही. उलट तोच वाटेत जाताना येताना आम्हांला आपणहून हटकायचा. कदाचित त्याची हि ग्राहक टिकवून ठेवायची बिझनेस पॉलिसी असावी....!

आता एव्हाना आम्ही शालेय जीवन संपवून महाविद्यालयीन जगात प्रवेश केला होता. आता आम्हांला, असे आपाने भर रस्त्यांत हटकणे खटकू लागले होते. त्याच्या त्या अजागळ वेशाची ओढ संपून त्याची किळस येऊ लागली होती. पण बालपणाच्या सुखद आठवणी तशाच रेंगाळायच्या मनात अधून मधून आणि मग घरी आलो की स्वतःलाच अपराधी वाटायचं. आपाला टाळल्याबद्दल. तो मात्र तसाच प्रेमाने चौकशी करायचा.... स्थितप्रज्ञासारखा..!!

पुढे बरीच वर्षे मी शिक्षणा निमित्त बाहेर होतो.. अधून मधून घरी जायचो.. संध्याकाळी नजर बाहेर गेटकडे रेंगाळायची.. वडील विचारायचे, "काय रे? आपाची वाट बघतोयस की काय...?" मी हो म्हणायचो.त्यावर ते सांगायचे, "अरे, आता तो अधून मधूनच येतो बाहेर.. त्याला आता झेपत नाही.. " बहुदा एव्हाना त्याने प्यायला सुरुवात केली असावी.. तशी मला शंका होती... पण खात्री नव्हती.

तरीही मी गावी गेल्यावर कधी भेटलाच आपा, तर आताशा मी त्याला "अहो, आपा" म्हणत असे. त्याला त्याच्या धंद्याविषयी विचारले तर तो हसून म्हणत असे, " अरे राजू, आता पूर्वी सारख्यो जत्रे -हवाक नाय, आणि आता जमान्य नाय सगळीकडे फिराक. पोराय आता लेज, कुरकुरे असा हायफाय खावक लागली.. झील मोठो झालो, चेडवांची लग्ना केलंय आता धांडो पयल्यासारखो झेपना नाय.. तरीव फिरतंय..."

म्हातारपणामुळे थकलेला हा अवलिया माझे बालपण समृद्ध करून गेला होता.. गावातील अनेकांच्या चेष्टेचा विषय बनलेल्या, या आपाने कधीकाळी, याच चेष्टा करणा-यांना त्यांच्या संध्याकाळच्या विशेष वेळी "चकणा" पुरविलेला असेल, त्यांच्या बालपणी त्यांच्याही इवल्या इवल्या हातांवर चार- दोन शेंगदाणे विनामोबदला ठेवले असतील, कोणत्याही अपेक्षेशिवाय त्याने याच लोकांचे निरोप या आवाठातून त्या आवाठात नेऊन पोहोचवले असतील. पण आज हेच तरुण, या वयोवृद्ध आपाची चेष्टा- हेटाळणी करताना बघून वाईट वाटते.

एक सायकल, एक पोतं चुरमुरे, तुटपुंजे उत्त्पन्न आणि आयुष्यभराच्या संकटांच्या जोरावर या आपाने आपला संसार कसा रेटला असेल? पोराबाळांच्या गरजा कशा भागविल्या असतील? त्यांची हौस मौज कशी केली असेल? हे प्रश्न आता माझा संसार करताना मला पडतो. या आपाने मला जगायला शिकवले, संघर्ष करायला, कष्ट करायला आणि लोकांची चेष्टा, निंदा सहन करायची अपार ताकद एकवटायला शिकवलेय. माझ्यासाठी तरी हा आपा नार्वेकर नेहमी माझ्या बालपणीचा एक जादुगार वाटत आलाय.. आणि नेहमीच वाटत राहील. हो, त्याने मला आयुष्यात एवढं काही दिलंय ना, की त्याची परतफेड नाही होऊ शकत. जेंव्हा जेंव्हा मी भेळ खातो तेंव्हा तेव्हा मला हा अवलिया आठवतो... अगदी आजही.. आज तो गेला आणि जाणवले की त्याची ती विशिष्ट आंबटगोड चवीची भेळही गेली कायमची..!!!

आपा, तुला.. नव्हे तुम्हांला समस्त बांदेकारांकडून विनम्र श्रद्धांजली..

सदैव आपल्या ऋणांत तुमचाच राजू गर्दे.

धन्यवाद.

प्रा. गुरुराज गर्दे.

"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प ".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.

What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com | aaryaads@yahoo.com
Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/