“मला भेटलेली देवमाणसे....” या लेखमालेतील पहिला लेख
"आपा नार्वेकर" आमच्या बालपणातील एक अवलिया...!!!
आमच्या लहानपणी आम्हांला आनंद देऊन जाणारी अनेक लोकं आपल्या आठवणीत राहतात आयुष्यभर. ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यात येऊन आपले बालपणीचे विश्व, आयुष्य बहारदार, रंगीत आणि समृद्ध करून जातात. माझ्या आयुष्यात माझा बालपणीचा काल ज्यांनी ज्यांनी सुखाचा केला त्यापैकीच एक म्हणजे हा आपा नार्वेकर.
एक जुनी सायकल, त्याच्या मागे कॅरियरवर लावलेले एक भलेमोठे चुरमु-याचे पोते, पुढे ह्यांडलला लटकवलेली एक पिशवी, अंगात पांढरा मळलेला बुशकोट आणि खाली खाकी मळखाऊ हाफपँट अशा वेशात, दुपार नुकतीच कलून संध्याकाळ व्ह्यायच्या वेळेला "चणे, शेंगदाणे, चुरमुरेsss" अशी आरोळी आली, की मी आशाळभूत नजरेने आमच्या घराच्या गेटवर धाव्वत येऊन, आमच्या आवाठात आलेल्या नि वयाची तिशी ओलांडलेल्या या आपा नावाच्या " काबूलीवाल्या" कडे अनिमिष नजरेने पाहत असे...
मला आठवतंय, याला मी पाहिल्यांदा पाहिला, जेंव्हा मी ३-४ वर्षांचा असेन. आषाढी एकादशीला, गावातील विठ्ठल मंदिराच्या बाहेर एका बाजूला दहा बाय दहाच्या पथारीवर बसून, तुळशी, उदबत्ती, फुले आणि गरम गरम शेंगदाणे विकत बसलेला.. माझे वडील मला घेऊन देवळात गेलेले.. तुळशी, फुले, उदबत्ती बाबांनी घरूनच नेलेली. त्यामुळे " सर, कायतरी घेवा मो.." असं आपाने म्हटल्यावर, माझ्या बाबांनी हसून त्याला "नंतर येतो" असा इशारा केला आणि ते मला घेऊन देवळात गेले.
देवळात त्यांनी विठोबाकडे काय मागितले माहित नाही, पण मी मात्र, 'बाहेर बसलेल्या त्या आपाकडील गरम गरम शेंगदाणे बाबांनी मला घेऊन द्यावेत', असे देवाला सांगितले. बाहेर आलो, बाबांनी निघताना आपाला २ रुपयाचे शेंगदाणे, २ रुपयाचे खारेमोरे आणि १ रुपयाचे चुरमुरे द्यायला सांगितले मात्र, माझा विठ्ठलावर प्रचंड विश्वास बसला आणि आपाबद्दल प्रचंड कुतूहल वाटू लागलं...
त्यानंतर तो आवाठात संध्याकाळी येण्याची मी जणू वाटच बघू लागलो... रोज शेंगदाणे, चणे किंवा फुटाणे घ्यावेत असे मला नेहमी वाटायचे. मी तसा बाबांकडे हट्टही करायचो, पण ब-याचदा मला शेंगदाणे, चणे - फुटाण्यांपेक्षा बाबांचे फटकेच मिळायचे. आपा मात्र, " राजू, तुका शेंगदाणे व्हये मां..? हे घे.. " असे म्हणून माझ्या इवल्याशा हातावर चार सहा दाणे टेकवून "चणे, शेंगदाणे, चुरमुरेsss" अशी आरोळी देत पुढे निघून जायचा.
तसा तो आमच्या घराजवळच रहायचा. बाजारात त्याचे एक छोटेसे पडीक असे दुकान होते.त्याच्या वाडवडिलांच्या कालापासून चालवलेले.बहुदा पूर्वीच्या काळी ते जोरात चालत असावे. पण, मी पाहत आलो तेंव्हापासून ते पडीकच दिसायचे... या दुकानात आपा चणे, फुटाणे शेंगदाणे, चुरमुरे, भेळ, त्याने स्वतःच्या घरात बनविलेले, गुळाच्या पाकातील चुरमु-याचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू, जाड आणि बारीक शेवाचे खडखडे लाडू, बुंदीचे लाडू असे अनेक प्रकार विकायला ठेवत असे. नंतरच्या काळात त्याला लेज आणि कुरकुरे विकायला दुकानात ठेवावे लागले ते केवळ नव्या पिढीची चव आधुनिक झाली म्हणून. नाहीतर आमच्या बालपणीच्या या स-या चावी त्यानेच समृद्ध केल्यात...
या आपाला आम्ही नेहमी एकेरीच बोलवायचो.. पूर्ण गावानेच त्याला एकेरी संबोधन केलेले.. मला आता वाटतं, फक्त आपाची बायको आणि त्यांची मुले एवढेच काय ते, त्या बिचा-याला आदरार्थी संबोधन करत असावेत.. नाहीतर बाकीचे सगळे लहान मोठे त्याला "ए आपा" अशीच हाक मारायचे... तो म्हातारा होईपर्यंत तो कधी "अहो" झालाच नाही. शिवाय त्यालाही ते फार प्रेमाचे वाटायचे हे विशेष ..
जत्रेच्या काळात हा आपा गावातील प्रत्येक जत्रेला आणि आजूबाजूच्या प्रत्येक गावातील जत्रेला आपले चणे, शेंगदाणे, चुरमुरे, फुटाणे आणि खेळण्यांचे दुकान लावायचा. मी माझ्या "आयुष्यातील पहिली भेळ" याच महामानवाच्या जत्रेतील पथारीवजा दुकानात खाल्ली. ती आंबटगोड चवीची भेळ नि खारट-तिखट चव माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदा खाल्ली तेंव्हा त्या रात्री मी किती आनंदात झोपलो होतो हे आजही मला स्पष्टपणे आठवतेय.. मग पुढे बरीच वर्षे तीच "आपाची भेळ" माझ्या बालपणातील आणि शालेय जीवनातील एक अविभाज्य भाग बनून राहिला. आजवर मी अनेक शहरात अनेक ठिकाणी अनेक नामांकित नि नावाजलेली भेळ खाल्लेय पण "आपाची भेळ" काही औरच...!
हा आपा सुरुवातीला रोज आणि मग पुढे पुढे दोन तीन दिवसातून एकदा तालुक्याच्या गावी, सावंतवाडीला सायकलने जाऊन ताजे ताजे चुरमु-याचे पोते आणायचा. बांदा ते सावंतवाडी बरोबर बारा किलोमीटरचे अंतर. आता कमी वाटते, पण तेंव्हा, माझ्या बालबुद्धीला ते प्रचंड वाटायचे. हा माणूस रोज एवढी सायकल चालवतो, वाडीला जातो आणि दुपारच्या आत परत येतो हे सगळेच अचाट आणि भव्यदिव्य वाटायचे... आवाठात आणि फारच फार तर बांदेश्वरापर्यंत सायकल चालवणारे आम्ही, सावंतवाडी म्हणजे आमच्या दृष्टीने इंग्लिश खाडीच पोहणे...!
या आपाने मध्यंतरी शाळेकडे मधल्या सुट्टीला यायचे सुरु केले होते. गावातील सिनेमाच्या तंबूकडे आपा नेहमी असायचा. इंटरव्हलला " एंगे लाडूsss एंगे लाडूsss" करत आपल्या मुलाला हळूच तंबूत पाठवायचा. आम्ही मोठे होऊ लागलो होतो, तोपर्यंत गावात फुटाणे, चणे, शेंगदाणे, चुरमुरे यांची दोन चार नवी दुकाने सुरु झाली होती. मोरे, साटेलकर असे या क्षेत्रातले नवे स्पर्धक आल्यावरही अनेक आवाठातल्या लहान मुलांना आणि गावातील जाणत्यांना मात्र, या फिरस्त्या आपाच्या सायकलीचीच क्रेझ होती. आम्ही मात्र कधी कधी आपाला टाळून या नव्या चकचकीत दुकानांमधून डोकावायचो. आपले ग्राहक या नवीन दुकानात जातात, हे ओळखूनही या माणसाची विनम्रता कधी ढळलेली मी पहिली नाही. उलट तोच वाटेत जाताना येताना आम्हांला आपणहून हटकायचा. कदाचित त्याची हि ग्राहक टिकवून ठेवायची बिझनेस पॉलिसी असावी....!
आता एव्हाना आम्ही शालेय जीवन संपवून महाविद्यालयीन जगात प्रवेश केला होता. आता आम्हांला, असे आपाने भर रस्त्यांत हटकणे खटकू लागले होते. त्याच्या त्या अजागळ वेशाची ओढ संपून त्याची किळस येऊ लागली होती. पण बालपणाच्या सुखद आठवणी तशाच रेंगाळायच्या मनात अधून मधून आणि मग घरी आलो की स्वतःलाच अपराधी वाटायचं. आपाला टाळल्याबद्दल. तो मात्र तसाच प्रेमाने चौकशी करायचा.... स्थितप्रज्ञासारखा..!!
पुढे बरीच वर्षे मी शिक्षणा निमित्त बाहेर होतो.. अधून मधून घरी जायचो.. संध्याकाळी नजर बाहेर गेटकडे रेंगाळायची.. वडील विचारायचे, "काय रे? आपाची वाट बघतोयस की काय...?" मी हो म्हणायचो.त्यावर ते सांगायचे, "अरे, आता तो अधून मधूनच येतो बाहेर.. त्याला आता झेपत नाही.. " बहुदा एव्हाना त्याने प्यायला सुरुवात केली असावी.. तशी मला शंका होती... पण खात्री नव्हती.
तरीही मी गावी गेल्यावर कधी भेटलाच आपा, तर आताशा मी त्याला "अहो, आपा" म्हणत असे. त्याला त्याच्या धंद्याविषयी विचारले तर तो हसून म्हणत असे, " अरे राजू, आता पूर्वी सारख्यो जत्रे -हवाक नाय, आणि आता जमान्य नाय सगळीकडे फिराक. पोराय आता लेज, कुरकुरे असा हायफाय खावक लागली.. झील मोठो झालो, चेडवांची लग्ना केलंय आता धांडो पयल्यासारखो झेपना नाय.. तरीव फिरतंय..."
म्हातारपणामुळे थकलेला हा अवलिया माझे बालपण समृद्ध करून गेला होता.. गावातील अनेकांच्या चेष्टेचा विषय बनलेल्या, या आपाने कधीकाळी, याच चेष्टा करणा-यांना त्यांच्या संध्याकाळच्या विशेष वेळी "चकणा" पुरविलेला असेल, त्यांच्या बालपणी त्यांच्याही इवल्या इवल्या हातांवर चार- दोन शेंगदाणे विनामोबदला ठेवले असतील, कोणत्याही अपेक्षेशिवाय त्याने याच लोकांचे निरोप या आवाठातून त्या आवाठात नेऊन पोहोचवले असतील. पण आज हेच तरुण, या वयोवृद्ध आपाची चेष्टा- हेटाळणी करताना बघून वाईट वाटते.
एक सायकल, एक पोतं चुरमुरे, तुटपुंजे उत्त्पन्न आणि आयुष्यभराच्या संकटांच्या जोरावर या आपाने आपला संसार कसा रेटला असेल? पोराबाळांच्या गरजा कशा भागविल्या असतील? त्यांची हौस मौज कशी केली असेल? हे प्रश्न आता माझा संसार करताना मला पडतो. या आपाने मला जगायला शिकवले, संघर्ष करायला, कष्ट करायला आणि लोकांची चेष्टा, निंदा सहन करायची अपार ताकद एकवटायला शिकवलेय. माझ्यासाठी तरी हा आपा नार्वेकर नेहमी माझ्या बालपणीचा एक जादुगार वाटत आलाय.. आणि नेहमीच वाटत राहील. हो, त्याने मला आयुष्यात एवढं काही दिलंय ना, की त्याची परतफेड नाही होऊ शकत. जेंव्हा जेंव्हा मी भेळ खातो तेंव्हा तेव्हा मला हा अवलिया आठवतो... अगदी आजही.. आज तो गेला आणि जाणवले की त्याची ती विशिष्ट आंबटगोड चवीची भेळही गेली कायमची..!!!
आपा, तुला.. नव्हे तुम्हांला समस्त बांदेकारांकडून विनम्र श्रद्धांजली..
सदैव आपल्या ऋणांत तुमचाच राजू गर्दे.
धन्यवाद.
प्रा. गुरुराज गर्दे.
"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प ".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
What's Up :- 9422058288
Email :- gururajgarde@gmail.com | aaryaads@yahoo.com
Facebook Link :- www.facebook.com/EduStudentCounselor
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde.blogspot.in/
No comments:
Post a Comment