आमच्या बांद्यातली नारळी पौर्णिमा -
श्रावण शुद्ध पौर्णिमा म्हणजेच "नारळी पौर्णिमा". यालाच नारळी पुनव, श्रावणी पुनव किंवा सागरी पुनव असेही म्हणतात. आजच्या दिवशी सागराला, त्याला जाऊन मिळणा-या नद्यांना थोडक्यात जलदेवतेला सन्मानाने नारळाचे अर्पण म्हणजेच "श्रीफळ" अर्पण करून मृग नक्षत्रापासून बंद झालेली मासेमारी आणि सागरी वाहतूक पुन्हा एकदा सुरु केली जाते.
शास्त्राप्रमाणे श्रावण पौर्णिमेस सागराची पूजा करून, त्याला श्रीफळ अर्पण करतात. म्हणून या दिवसाला "नारळी पौर्णिमा" असे म्हणतात. जरी श्रीफळ सागराला अर्पण करावयाचे असले तरी, हेतू संपूर्ण जलदेवतेची पूजा हाच आहे. कोळी समाजाचा आणि सागराचा संबध अतूट असल्याने ते "नारळी पौर्णिमा" वाजतगाजत, थाटामाटात आणि अतिशय जल्लोषात साजरी करतात. पालखी सजवून तिच्यात सोन्याचा नारळ (सोन्याचा मुलामा) ठेऊन नाचत, गात अतिशय आनंदाने मिरवणूक काढून समुद्रकिना-यावर, नदी किना-यावर येतात. सूर्यास्ताबरोबर नारळाची पूजा करून, दर्या देवताला नारळ समर्पण करतात. प्रार्थना म्हणतात, की “ हे पर्जन्य वर्षावाने उधाणलेल्या दर्यादेवा, शांत हो आणि तुझ्या लाटा सौम्य होऊन आमचे वादळ, तुफान इत्यादीपासून रक्षण कर.”
समुद्राकाठी रहाणार्या व प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्ती सोन्याचा नारळ अथवा नुसता नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी कोळी लोक आपल्या होड्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात, नदीत जातात.
आमच्या बांदा गावाला नारळी पौर्णिमेची पूर्वापार चालत आलेली एक विशिष्ट अशी परंपरा आहे. तशी ती कोकणातल्या ब-याचशा गावांना थोड्याफार फरकाने असतेच म्हणा. पण आमच्या बांदा गावचा आणि एकूणच कोकणातील, पावसाळ्यानंतर म्हणजे मिरगानंतर येणारा पहिला मोठा सामुदायिक सण म्हणून, या नारळी पौर्णिमेच्या सणाला विशेष असे महत्त्व आहे. कुणबी (शेतकरी) आणि वाणी (व्यापारी) समाजाचे बाहुल्य असलेल्या आणि पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठ असलेल्या, आमच्या शेतीप्रधान गावात दरवर्षी साधारणतः ६-७ जून ला हमखास मिरग लागतोच. मिरगाची तयारी पंचक्रोशीतील शेतकरी आणि व्यापारी वर्ग आपापल्या परीने सुरु करतो.
म्हणजे, चाकरमान्यांना हास-या चेह-याने पुणा - मुंबईला कोकणमेव्यासोबत खुशी-खुशी धाडून दिले की, सगळे गाव आपल्या पावसाळ्याच्या तयारीला लागते. मे महिना संपताना आणि जून महिना सुरु होता होता, आमचा कोकणातला शेतकरी अजूनही पारंपारिक, लोखंडी नांगर धवडाकडे भट्टीत घालून आणतातच. सोमवारी म्हणजेच बाजाराच्या दिवशी मेणकापड, खोळी, गमबुट, बी बियाणे, बैल आणि जोताचे सामान, घरचा किराणा माल आणि मुलांच्या शाळेचे साहित्य खरेदी करतात. कारण मग पुढे २-३ महिने त्यांना संततधार पडणा-या पावसातून आणि शेतीच्या कामातून या सगळ्याला वेळच मिळत नाही. तसं महाराष्ट्रातील इतर दुष्काळी भागातील शेतक-या सारखा आमच्या कोकणातल्या शेतक-याला कधी पावसाने दगा नाही दिला....!! कदाचित कोकणातील शेतकरी निसर्गाच्या अजूनही तितकाच जवळ आणि निसर्ग पूजक असल्यामुळे असेल म्हणा. त्यामुळेच, हा नारळी पौर्णिमेचा सण, याच निसर्ग पूजनाचा एक भाग आहे.
इकडे गावातील ५०% शेतकरी वर्ग शेतीत गुंतलेला असतो, तर उर्वरीत ३०% वाणी समाज, हा या सर्वांच्या मौन्सूनपूर्व बेगमीच्या मदतीला तयार असतो. जूनच्या १ तारखेपासूनच गावातील, बाजारपेठेतील दुकाने अभ्यासाच्या नवीन वह्या, पुस्तके, दप्तरे, शालेय साहित्य आणि छत्र्या, रेनकोट, मेणकापड, खोळी यांच्या विविध प्रकारांनी नटून सजून जातात. गावातील अनेक व्यापारी वसंत ऋतूतील, उन्हाळ्याच्या सुटीतील नारळ, सुपा-या, कोकम, रातांबी, काजू, फणस यांसारख्या कोकणी मेव्याच्या व्यवसायातून मोकळे झालेले असतात. पण "जरासा आळसावतो," असं म्हणूनही, त्यांना आळस घ्यायला फुरसत नसते. नारळ, सुपारी आणि काजूची पोती भरभरून, ट्रक लोड करून गावाच्या वेशी ओलांडतात न ओलांडतात, तोच या मौन्सूनपूर्व बेगमीच्या मालांचे ट्रक गावच्या बाजारपेठेत दाखल होतात. गावातील विविध दुकानांमधून नवीन साहित्याची विभागणी, प्रत्येकाच्या दुकानातील मांडणी आणि त्याची दरनिश्चिती यात मिरग कधी येतो ते या व्यापारी वर्गाला कळतच नाही. मग पुन्हा सुरु होतो वर्षा ऋतूतील व्यवसायाचा सारीपाट.....! "जरासा आळसावतो" असं म्हणणारे मग पुढे २-३ महिने मान वर करूनही बघत नाहीत.
अशातच जेष्ठ जातो, आषाढ सरतो, आणि श्रावण सुरु होतो. नाही म्हणायला आषाढातील मोठी एकादशी गावात मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते, पण त्याला वरुणराजाची जोरदार हजेरी असतेच हमखास. म्हणून मग गावात ज्याला जसे जमेल तसे आणि त्या वेळेत जो तो मुसळधार पावसात हळूच येऊन गावातील विठ्ठल मंदिरात विठोबाचे दर्शन घेऊन जातो.... शेतकरी राजा तर रात्रीच्या दिंड्यांना आणि उसळीच्या प्रसादाला न चुकता हजर असतो, खरीपाच्या शेतकामांत तेवढाच विरंगुळा.... मग तशातच श्रावण येतो सणासुदीचे दिवस घेऊन. आकोबा कोकोबा पुजताना गावातील मुली, तरुणी आणि महिला फुगड्यांचे फेर धरू लागतात, नागपंचमीच्या सणाला मातीच्या नागांचे पूजन होते घराघरात, श्रावण सोमवारी गावच्या देवाला बांदेश्वराला आणि पाटेश्वराला गावातील सुवासिनी शिवमूठ वाहायला बाहेर पडतात, मंगळागौरीला नव्या नि जुन्या वशेळ्यांच्या मंगळागौरीच्या रात्री जागू लागतात. पण, सबंध गावाचा सामुदायिक सण म्हणून मान मिळतो ते "नारळी पौर्णिमेला"च ....!!
सकाळी ग्रामदैवताच्या देवळात दुपारच्या पालखीची तयारी सुरु होते. गावाचे गावकरी, मानकरी, व्यापारी आणि पुजारी असे सारे, ग्रामदैवताच्या पालखी सोहळ्याच्या तयारीत गुंततात. इथे गावातील सारे लहान थोर, सगळ्या धर्मांचे, सगळ्या जाती पातीतील, सगळ्या स्तरांतील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. या सगळ्यात, गावातील देवळाचा मान असणारे गावकांर अर्थातच, सर्वांच्या पुढे असतात. ते ग्रामदैवताची म्हणजे बांदेश्वराची पालखी सजवतात. गावचा देव नारळीपौर्णिमेला स्वतः पालखीत बसून दिमाखात नदीवर जातो आणि नदीच्या रूपातील जलदेवतेला "सोन्याचा नारळ" अर्पण करतो ही ती प्रथा...
" हा सोन्याचा नारळ खरंच सोन्याचा असतो का......?" हा प्रश्न मी लहानपणी माझी आई, माझे बाबा, माझे मित्र, देवळातील भटजी, गावकांर, भजनी मंडळी, पालखीचे मानकरी अशा अनेकांना विचारलेला मला आठवतोय. त्या सर्वांची उत्तरे वेगवेगळी होती, पण श्रद्धा मात्र एकाच होती. तो सोन्याचा नारळ काही मला शेवटपर्यंत बघायला मिळाला नाही कधी लहानपणी, पण, मोठा झाल्यावर त्यामागची प्रत्येक बांदेकाराची भावना मात्र कळली, बघायला मिळाली.
ग्रामदैवताच्या देवळापासून ते नदी पर्यंतच्या प्रवासात "देवाचा प्रसाद" म्हणून मानाचा नारळ गावातील इतर महत्वाच्या देवांच्या ठाण्यांनाही मिळत जातो. मग ती घोडेमोडणी असो, मोर्येवाड्यातील मुसलमान मुजावरांचा पीर असो, विठ्ठल मंदिरातील विठोबा असो, किंवा आळीतील, पोलीसस्टेशनातील पाटेश्वर असो.....!!! देवाचा मानाचा नारळ गावक-यांच्या मनातील जातीपाती, देवा धर्मांच्या सीमा ओलांडून अख्ख्या गावाला वैश्विकतेच्या पातळीवर नेऊन ठेवतो. याच विश्वबंधुत्वाच्या संदेशात, हा भव्य पालखी सोहळा वाजत गाजत या सर्व ठाण्यांना भेटी देत देत नदी पर्यंत येऊन पोहोचतो.
यात पालखीचे भोई व्हायचा मान गावकांरांचा.... गावातील मोर्ये, सावंत भोसले आणि परब यांच्या पिढ्यानपिढ्या देवाची सेवा करतायत... पालखीतील भजन, गाणी म्हणण्याची आणि वादन करण्याची सेवा गावातील प्रत्येकजण आपापल्या परीने आणि कुवतीनुसार करण्याचा प्रयत्न करतो. देवाची तळी ( आरती) धरायचा मान भटाचा.......!! पूर्वी ही आरती गंपू वाटवे कडे असायची. माझ्या लहानपणी त्याच्या बरोबर या पालखीतून चालताना, मी सारखा त्याच्या मध्ये मध्ये येतो म्हणून, त्या गंपू भटजींचे किती तरी धपाटे मी खाल्लेयत. पालखीच्या पुढे ताशा वाजवायचा मान मुसलमान मुल्ला घराण्याकडे. माझ्या लहानपणापासून बांदेश्वराच्या देवळासमोर आणि पालखीसमोर न चुकता नेमाने ताशा वाजविणारे, इस्माईल मुल्ला या माझ्या मित्राचे वडील, आजही माझ्या डोळ्यांसमोर उभे रहातात. किंबहुना, त्यांच्या ताशांच्या त्या आवाजावरूनच तर, गावातील घराघरांतून पसरलेल्या, आमच्यासारख्या "वानरसेनेला" या पालखीच्या सोहळ्याची चाहूल लागायची...
ही पालखी गावातून निघाली की, गावातील प्रत्येक घरातील कर्ता पुरुष, आपल्या घरचा नारळ नदीला अर्पण करायला, त्या पालखी सोहळ्यात नारळासह सामील होत जातो. जसजशी पालखी पुढे पुढे निघते, तसतशी या पालखी मार्गावरील घराघरातील सुवासिनी देवाच्या पायावर पाणी घालायला, कळशी घेऊन पुढे होतात. वाटेवर रांगोळ्या घातलेल्या असतात, घातल्या जातात. देवाचे दर्शन घेतले जाते आणि नदीवर जाणे शक्य नसेल तर आपल्या घरचा नारळ गावकारांकडे जमा केला जातो. पालखी महाजन आळी, बाजारपेठ, विठ्ठल मंदिर, मोर्येवाडा असे करत करत पोलीस स्टेशनमधील पाटेश्वराला जाऊन, खालच्या आळीतून नदीकिनारी पोहोचते.
तिथे आधीपासूनच तयारीत असलेले तारी आणि तेल्यांच्या होड्या पाण्यात जायला तयारच असतात. गावातील अनेक घरांतून अर्पण करण्यासाठी आलेले नारळ जेंव्हा नदीत टाकले जातात, तेंव्हा होड्यांच्या आणि नारळ पटकावणा-या पोरांच्या पोहण्याच्या स्पर्धा असतात.
नदीकिनारी पालखी आल्यावर, मग देवाची आरती होते. पावसाच्या कृपेसाठी, बळीराजाच्या सुखासाठी, धनाधान्याच्या समृद्धीसाठी, बाजारपेठ आणि व्यापार उदिमाच्या उत्कर्षासाठी आणि एकूणच संपूर्ण गावाच्या भल्यासाठी गा-हाणे घातले जाते. नदीची, समुद्राची, जलदेवतेची प्रार्थना केली जाते आणि ग्रामदैवताचा "मानाचा नारळ" सर्वप्रथम नदीला गावकारांकडून आणि प्रमुख ग्रामस्थांकडून अर्पण केला जातो. आणि मग सुरु होते, नारळ नदीच्या पाण्यात दूरवर, अधिकाधिक लांब फेकण्याची स्पर्धा....!!! नदीपात्रात अनेक नारळांचा जणू पाऊसच पडू लागतो. बघता बघता नदीचे पात्र तरंगत्या नारळांनी भरून जाते. स्पर्धा, चढाओढ सुरु होते होड्या पळविण्याची आणि अधिकाधिक नारळ गोळा करण्याची. सुमारे तासभर चाललेल्या या चढाओढीने, बघणा-यांचा उत्साह आणि जोश सहभागी पोहणा-या स्पर्धकांचा हुरूप वाढविण्यास कारणीभूत ठरतो. या स्पर्धा बघणे, अनुभवणे आणि यात सहभागी होणे हे सारे, म्हणजे आमच्या कोकणातील गावागावांतून भरणारे ऑलिंपिकच.!!! प्रचंड उत्साह, प्रचंड जल्लोष आणि प्रचंड स्पर्धा....!!!
पालखी परतीच्या वाटेवर येते, तेंव्हा सगळा गाव प्रसाद घ्यायला गोळा झालेला असतो. नारळी पौर्णिमेच्या "शिरणीचा प्रसाद" खाण्यात एक वेगळीच गम्मत असते. हे शिरणीचे तुकडे घरी आणून, नारळीभात करताना त्यात घातले जातात. नारळी पौर्णिमेच्या दिवसाचे महत्त्व बहिणीकडून राखी बांधून घेणे आणि केवळ नदीवर जाऊन दंगा करणे, असं मानणा-या शाळकरी मुलांचे दिवसभराचे सगळे कष्ट विसरायला, हा नारळीभातच भाग पाडतो. नारळी पौर्णिमेची सकाळ आमच्या गावात हातांवर बांधलेल्या राख्या मिरविण्यात, तर संध्याकाळ खांद्यावर बांदेश्वाराची पालखी मिरविण्यात जाते. अशी ही बांद्याची अनोखी नारळीपौर्णिमा माझे बालपण आणि अवघे जीवनच समृद्ध करून गेलेय.
"ही सगळी गम्मत अनुभवायला मी नारळीपौर्णिमेला बांद्यात असायला हवा होतो", अशी हुरहूर बांद्यात बालपण घालविलेल्या आणि आता गावापासून दूर असलेल्या माझ्यासारख्या प्रत्येक बांदेकाराला नाही वाटली, तरच नवल......!!!
अशी ही नारळी पौर्णिमा आमच्या बांद्यातच येऊन, तुम्हीही अनुभवा एकदा .......... !!
यंदाच्या, या वर्षीच्या नारळी पौर्णिमेचे तुम्हांला आत्ताच निमंत्रण........!!!
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
धन्यवाद.
प्रा. गुरुराज गर्दे.
"महाराष्ट्राचे शैक्षणिक पुनःनिर्माण प्रकल्प ".
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
ABCD - आर्या ब्युरो ऑफ करियर डेव्हलपमेंट, पुणे.
गाळा क्र. ६, लक्ष्मीवंदन अपार्टमेंट,
गावविहिरीच्या समोर, रायकरमळा रोड,
मारुती मंदिर जवळ, शेवटचा बस स्टॉप,
धायरी, पुणे. ४११०४१.
सहजसंपर्क :- 9422058288 / 9021501924.
माझा ब्लॉग वाचा :- http://gururajgarde. blogspot.in/
Facebook Link :- www.facebook.com/ EduStudentCounselor
प्रतिक्रिया जरूर कळवा.........!!!
छायाचित्र सौजन्य :- परममित्र श्री. योगेशजी काणेकर, बांदा.
No comments:
Post a Comment